बेळगाव : येळ्ळूरप्रकरणी भूमिका मांडण्यासाठी आणि सीमावासीयांना धीर देण्यासाठी बेळगावला आलेल्या शिवसेनेच्या दिवाकर रावते, सुजित मिणचेकर यांना बेळगावात पत्रकार परिषद घेण्यास पोलिसांनी अटकाव केला. यावेळी रावते आणि मिणचेकर यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही आमदारांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी शिनोळी येथे कर्नाटक सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे दहन केले .आज, शुक्रवारी सकाळी बेळगावमधील एका हॉटेलमध्ये शिवसेनेच्या नेतेमंडळींच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेला प्रारंभ झाल्यावर लगेचच टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिश्चंद्र्र हे आपल्या फौजफाट्यासह तेथे दाखल झाले. त्यांनी रावते, मिणचेकर आणि इतरांना पत्रकार परिषद घेण्यास कर्नाटक पोलीस कायदा कलम ३५ (१) (ई ) अन्वये प्रतिबंध केला. यावेळी त्यांच्यात आणि पोलीस अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक झडली. या घटनेनंतर दोन्ही आमदार आणि इतरांनी परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक भास्कर राव यांची भेट घेण्याचे ठरविले. त्यांना भेटण्यास जात असताना पोलिसांची जीप आपला पाठलाग करीत असल्याचे ध्यानात आल्यावर मिणचेकर आणि इतरांनी भास्कर राव यांना भेटायला जाण्याची योजना रद्द करून शिनोळीला जाऊन आपला निषेध नोंदविण्याचे ठरवले. पाठलाग करणाऱ्या पोलीस जीपला अपघात झाला आणि पोलीस जखमी झाल्याची घटना घडली .शिनोळी फाट्यावर आमदार दिवाकर रावते, सुजित मिणचेकर, कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी कर्नाटक सरकारने मराठी भाषिक जनतेवर केलेल्या अत्याचारांचा निषेध करीत, कर्नाटक सरकारची अंत्ययात्रा काढून कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी आमदार मिणचेकर म्हणाले, आम्ही येळ्ळूरच्या जनतेचे सांत्वन करण्यासाठी तसेच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगून धीर देण्यासाठी आलो होतो. कर्नाटक सरकारच्या अरेरावीमुळे कर्नाटकी पोलिसांना वेगळे बळ आले आहे. त्यामुळेच त्यांनी आमची पत्रकार परिषद उधळून लावली. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याचा निकाल लागेपर्यंत केंद्र सरकारने सीमाभाग केंद्रशासित म्हणून घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)
बेळगावात पुन्हा कानडी दांडगाई
By admin | Updated: August 2, 2014 02:56 IST