योगेश गुंड, अहमदनगरलग्न समारंभातील सत्कार व मानसन्मानावर होणारा वायफळ खर्च टाळून त्यातून वन्य प्राण्यांसाठी पाणवठे व चारा उपलब्ध करून देण्याचा समाजाभिमुख उपक्रम कामरगाव (ता. नगर) येथील गावकऱ्यांनी राबवला आहे. सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांच्या पुढाकारामुळे दुष्काळात पाणी व चाऱ्यासाठी वणवण करणाऱ्या वन्य जीवांना मोठा आधार मिळाला आहे.सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू आहे. लग्नात महत्त्वाच्या पाहुण्यांना शाल, फेटे, पुष्पगुच्छ दिले जातात. शिवाय इतरही वायफळ गोष्टींवर हजारो रुपये खर्च होतात. सत्कारावरून नाराजी नाट्यही रंगते. त्यामुळे मनस्ताप होतो, तो वेगळाच. लग्नात वायफळ खर्च टाळून त्या पैशांतून वन्य जीवांसाठी पाणवठे व हिरवा चारा उपलब्ध केला तर, त्यांची दुष्काळात अन्न-पाण्यासाठी होणारी वणवण थांबवणे शक्य होईल, अशी कल्पना सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी मांडली. त्याला गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. कामरगाव नगर, पारनेर तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वनविभागाचे ४०० हेक्टर वनक्षेत्र आहे. त्यात लांडगे, हरिण, तरस, खोकड, मोर, रानडुक्कर, ससे, विविध पक्ष्यांचा मुक्त संचार असतो. उन्हाळ््यात त्यांची तहान व भूक भागविण्यासाठी शासकीय स्तरावर कुठलेच नियोजन होत नाही.गावकरी लग्नात अनावश्यक खर्च टाळून ५०० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंतचा निधी जमा करु लागले. गावकऱ्यांनी निधीतून वनक्षेत्रातील डोंगरी भागात चार पाणवठे बनविले. त्यात रोज पाणी सोडले जाते. त्यासाठी रोज ३०० रुपये खर्च होतात. पाणवठ्यांजवळ वन्य प्राण्यांसाठी चाराही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाणवठ्यांमुळे वनप्राण्यांची मानवीवस्तीत येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पिकांची नासधूसही थांबली आहे.
लग्नातील खर्च टाळून वन्यजीवांसाठी पाणवठे!
By admin | Updated: June 3, 2015 01:43 IST