अकोला: राजस्थानमधील बिकानेरहून यवतमाळ जिल्हय़ातील उमरखेड जाण्यासाठी निघालेल्या १५ वर्षीय मुलीला हनिफा नामक महिला मुंबईला नेत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. पीडित मुलीला वधूचे लाल कपडे घालून आणि हातावर मेहंदी काढून तिला मुंबईमध्ये विकण्याचा हनिफाचा प्रयत्न होता का? असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी हनिफा नामक महिलेला ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अकोल्यात आल्यावर उमरखेड बस न मिळाल्याने पीडित मुलगी रेल्वे स्टेशनवरील विश्रामगृहावर पोहोचली. या ठिकाणी रिजवान शाहने तिला विश्वासात घेत, तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. रिजवानच्या तावडीतून तिने कशीबशी सुटका केल्यानंतर ती हनिफा नामक महिलेकडे पोहोचली. हनिफाने तिला तिच्यासोबत काही दिवस ठेवले आणि फूस लावून मुंबईला नेण्याचा तिचा प्रयत्न होता. परंतु पीडित मुलगी हनिफाच्याही तावडीतून सुटली आणि आकोट फैल पोलीस ठाण्यात जाऊन तिने आपबिती कथन केली. त्यानंतर पोलिसांनी तिची सुधारगृहात रवानगी केली. या ठिकाणी महिला व बालकल्याण समितीसमोर तिच्यावर बेतलेले प्रसंग तिने कथन केले. रिजवान शाह अयूब शाहने तिचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले होते.
राजस्थानातील मुलीला मुंबईत विकण्याचा प्रयत्न!
By admin | Updated: December 7, 2015 02:38 IST