पुणे : बँकेत पाचशे रुपयांच्या ९ बनावट नोटा भरण्याचा प्रयत्न करणाऱ्याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. शहाजमाल नुरशाद शेख (वय २९, रा. पश्चिम बंगाल) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी आदिती येरणडे (वय ३५, रा. सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील अॅक्सिस बँकेच्या शाखेत १८ जुलै रोजी सकाळी घडली. शहाजमाल शेख हा राजीव बिस्वास या नावाच्या व्यक्तीच्या खात्यात एक लाख ३० हजार रुपये भरण्यासाठी बँकेत आला होता. ही रक्कम जमा करत असताना त्यातील पाचशे रुपयांच्या ९ नोटा बनावट असल्याचे बँकेच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यानंतर शेखला अटक करण्यात आली. त्याला मंगळारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने पैसे भरण्यास कोठून आणले होते आणि त्याचे बनावट चलन व्यवहारात आणणाऱ्या टोळीशी संबंध आहेत का, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने त्याला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
बनावट नोटा भरणा करण्याचा प्रयत्न
By admin | Updated: July 20, 2016 00:47 IST