भोसरीतील घटना, गणेशोत्सव मंडळाचा प्रताप
ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. २० : गणेशात्सवाची वर्गणी दिली नाही, म्हणुन भोसरी लांडगे आळीतील एका गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेकरीतील कामगारांना पदपथावर आणून चक्क जोर बैठका मारायला लावल्या. वगर्णणी देण्यास नकार दिला म्हणुन ही एक प्रकारे आगळ्या वेगळ्या प्रकारची शिक्षा दिली. १५ आॅगस्टला घडलेल्या या प्रकरणाची भोसरी पोलिसांकडे शनिवारी फिर्याद दाखल झाली. तीन जणांविरुद्ध भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश मारुती लांडगे (वय ३०),गणेश बबन लांडगे (वय ३०),महेश बाबुराव मरे (वय २१,सर्व रा.लांडगे आळी भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत. ते लांडगे आळीतील श्रीराम गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणी इर्शाद महमंद आयुब खान (वय २१, रा.सखुबाई गार्डन चाळ, जय महाराष्ट्र चौक,भोसरी) यांनी आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. गणेशोत्सवाला अवघा १५ दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची वर्गणी जमा करण्याची लगबग सुरू आहे. १५ आॅगस्टला सायंकाळी श्रीराम मंडळाचे कार्यकर्ते परिसरात वर्गणी मागत फिरत होते. बेकरीत काम करणारा इर्शाद हा बेकरीतच होता. त्यावेळी आलेल्या तरुणांच्या घोळक्याने त्याला वर्गणी मागितली. १५१ रूपये वर्गणी द्यावी लागेल.असा आग्रह धरला. एवढया मोठ्या रकमेची वर्गणी देऊ शकत नाही. कमीत कमी रकमेची वर्गणी घ्या, अशी विनवणी करणाऱ्या इर्शादकडे त्यांनी १३१ रूपयाची पावती फाडण्याचा आग्रह धरला. त्याने ही रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांनी इर्शादला बेकरीच्या बाहेर काढले. जवळच असलेल्या पदपथावर नेले. तेथे जबरदस्तीने त्यास जोर बैठका काढाण्यास भाग पाडले.
वर्गणी ऐच्छिक स्वरुपाची असताना, पिंपरी चिंचवडच्या काही भागात सर्रासपणे सक्तीने वर्गणी वसूली केली जाते. दरवर्षी अशा घटना घडू लागल्या आहेत. भोसरीत घडलेल्या घटनेत ज्या आरोपींवर तक्रार आहे.त्या आरोपींपैकी एक जण रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.या घटनेचा व्हीडीओ व्हॉटसअॅपवर व्हायरल झाला.त्यामुळे पोलिसांनी दखल घेतली. अन्यथा या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष झाले होते. या घटनेमुळे भोसरी परिसरात व्यापाऱ्यांमध्ये घबरट पसरली आहे.