ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 8 - श्री स्वामी समर्थ केंद्र, सुभाष चौक मित्रमंडळ व सुभाष चौक पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता सुभाष चौक मित्रमंडळाच्या गणपतीसमोर श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एकाच वेळी हजारोंच्या मुखातून गणपती स्तुतीच्या गणपती अथर्वशीर्ष पठणाचे स्वर वातावरणात मिश्रित होऊन निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून राष्ट्र समृद्धी, सर्वत्र शांतता, समृद्धी, कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रविवारी या ठिकाणी तीन हजार भक्तांद्वारे २१ आवर्तन होणार असून प्रमुख आचार्य महेशकुमार त्रिपाठी महाराज यांच्या उपस्थितीत ओंकार ध्वनी व शंखनाद शांतीपाठाद्वारे कार्यक्रमाची सुरुवात होईल. सुभाष चौकात भव्य मंडप टाकून तसेच मोकळ्या जागेतही तीन हजार भक्तांची बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. वातावरण निर्मिती करून गुरवांच्या वाजंत्रीने स्वागत केले जाणार आहे. गंध, टिळा लावून गणपती अथर्वशीर्षच्या पुस्तकाचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमानंतर सोडत काढण्यात येऊन ५१ भक्तांना चांदीची गणपतीची प्रतिमा भेट देण्यात येणार असून येथे पिण्याच्या पाण्यासह, चप्पल स्टँड इत्यादी व्यवस्था केली जाणार आहे. कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. सहभागी होण्याचे आवाहन श्रीकांत खटोड, मनीष अग्रवाल, विजय जगताप, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे भाऊलाल शिंपी यांनी केले आहे.
जळगावात ३ हजार भक्त करणार रविवारी अथर्वशीर्ष पठण
By admin | Updated: September 8, 2016 23:39 IST