ऑनलाईन लोकमतकोल्हापूर, दि.२१ - शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री साडेनऊ वाजता देवीची फुलांनी सजविलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. मध्यरात्रीनंतर जागराचा होम करण्यात आला. कोल्हापूरची अंबाबाई ही आसुरांचा संहार करणारी आणि प्रजेचे रक्षण करणारी देवता आहे. आदिशक्ती आणि दुर्गेचे एक रूप असलेल्या या देवीचा सकाळी शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महिषासुरमर्दिनी रूपात तिची पूजा बांधण्यात आली. अष्टमीला दक्षयज्ञाचा विध्वंस करण्यासाठी अत्यंत क्रोधाने भगवान शंकराने आपल्या शरीरातून भद्रकाली, महाघोर रुद्रगण, कोटियोगिनी असे महाशक्तिगण निर्माण केले. यामुळे अष्टमीची पूजा, उपवास, जागर आणि चंडीहोमाला विशेष महत्त्व आहे. महिषासुराच्या अत्याचारांच्या व्यथा घेऊन सर्व देव शंकर व विष्णूकडे गेले. या दैवतांच्या तेजातून निर्माण झालेल्या दुर्गेने घनघोर युद्ध सुरू केले. आपल्या मायावी शक्तीने महिषासुराने अनेक रूपे घेतली.अखेर महिषाचे (रेड्याचे) रूप धारण केलेल्या या दैत्याचा देवीने वध केला; म्हणून अष्टमीला अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधली जाते. ही पूजा मयूर मुनीश्वर, मंदार मुनीश्वर, अरुण मुनीश्वर यांनी बांधली.रात्री तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची वाहनातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. भवानी मंडपात तुळजाभवानीची भेट घेतल्यानंतर पुन्हा वाहन मंदिरात आले. रात्री उशिरा जागराचा होम करण्यात आला.
अष्टमीला अंबाबाई महिषासुरमर्दिनी रूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2015 19:45 IST