ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३० - पेड न्यूजप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाच आरोप निश्चित केले आहे. या प्रकरणाची ९ जूनपासून दररोज सुनावणी होणार असून २० जूनपर्यंत निवडणूक आयोग याप्रकरणावर निकाल देईल अशी शक्यता आहे.
पेड न्यूजप्रकरणात शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. निवडणुक आयोगाने चव्हाण यांच्यावर पाच आरोप निश्चित केले. चव्हाण यांनी पेड न्यूज दिली होती का, दिली होती तर त्याचा निवडणूक खर्चात समावेश केला होता का, केला नसल्यास त्याचे कारण काय, खर्चात समावेश न करता त्यांनी खर्चाचे उल्लंघन केले का, त्यांचे सदस्यत्व का रद्द होऊ नये अशा पाच प्रमुख मुद्द्यांचा यात समावेश आहे. यातील प्रत्येकी एका मुद्द्यावर ९ जूनपासून दररोज सुनावणी होणार आहे. याप्रकरणात दोषी ठरल्यास चव्हाण यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
२००९ मध्ये मुख्यमंत्रीपदावर असताना अशोक चव्हाण यांनी काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून आणल्या होत्या. या बातम्या पेड न्यूज असल्याचा आरोप करत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली होती. याला चव्हाण यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग पेड न्यूजप्रकरणी कारवाई करु शकते असे स्पष्ट आदेश देत चव्हाण यांना धक्का दिला होता. यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सुनावणी सुरु केली.