यदु जोशी / मुंबई
अकोला येथील शिवसेनेचे नेते मातोश्रीबाहेर बुधवारी रात्री हमरीतुमरीवर आले. नेत्यांनी एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदशर्र्ींनी सांगितले. रात्री उशिरा आ. गोपीकिसन बाजोरिया यांना अकोला पूर्व मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे हे अकोला पूर्व मतदारसंघातून उमेदवारीचे दावेदार आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क नेते दिवाकर रावते यांच्या अत्यंत निकटवर्ती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य ज्योत्स्ना चौरे यांना उमेदवारी दिली जात असल्याचे समजल्यानंतर गावंडे यांच्यासह इतर सगळे दावेदार अस्वस्थ झाले आणि त्यांनी रात्री मातोश्री गाठली. चौरे यांना कोणत्याही परिस्थितीत तिकीट देऊ नका, असे त्यांचे म्हणणे होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची भेट झाली नाही. गावंडे, आ. गोपीकिसन बाजोरिया, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर आदींनी विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि रावते यांची भेट घेतली. चौरे यांच्या उमेदवारीला त्यांनी तीव्र विरोध दर्शविला. आमच्या तिघांपैकी एकाला उमेदवारी द्या, असे ते म्हणाल्याचे समजते. या भेटीनंतर रात्री १0.१५च्या सुमारास हे नेते मातोश्रीबाहेर आले. गेटवरच गावंडे आणि पिंजरकर यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. पिंजरकर आपल्या उमेदवारीला विरोध करत असल्याचा समज झालेले गावंडे यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. ह्यतू किती कमावले, कुठून कमावले हे मला सगळे माहिती आहे,ह्ण असे ते म्हणाले. पिंजरकर यांनीही त्याच शब्दांत गावंडेंना सुनावले. गावंडे त्यांच्या अंगावर धावून जात असताना त्यांचे पुत्र संग्राम यांनी वडिलांना बाजूला नेले. बाजोरिया आणि इतरांनी पिंजरकर यांना दुसरीकडे नेले. अकोला जिल्ह्यातील आकोट आणि अकोला पूर्वची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. आकोटमध्ये विद्यमान आमदार संजय गावंडे यांच्यासाठी रावते यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे आणि पूर्व अकोल्यातही त्यांच्याच सर्मथक ज्योत्स्ना चौरे यांना संधी दिली जाणार या वृत्ताने इतर स्थानिक ने त्यांमध्ये तीव्र नाराजी होती. रावतेंच्या सांगण्यावरून उमेदवारी ठरवायची असेल तर आम्ही काय करायचे असा स्थानिक नेत्यांचा आणि दावेदारांचा सवाल होता. रात्रीच्या घडामोडीनंतर बाजोरिया यांना उमेदवारी देण्यात आल्याचे खात्रीलायक समजते.