रत्नागिरी : जैतापूर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसह जोरदार घोषणा देत गुुरुवारी कुवारबांव येथे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील मोर्चाने प्रकल्पाविरोधात जोरदार हल्लाबोल केला. शिष्टमंडळाला प्रकल्पाच्या रत्नागिरी कार्यालयात जाऊही न दिल्यामुळे ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांसह ६१२ आंदोलकांची धरपकड करण्यात आली. त्यांच्यावर कलम ६८ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून कलम ६९ अन्वये सोडून देण्यात आले. मात्र, पोलिसांच्या तटबंदीत या आंदोलनाची पुरती घुसमट झाली. आंदोलकांच्या संख्येच्या दुप्पट पोलीस, अशी स्थिती दिसत होती. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलनाची जोरदार तयारी केली होती. या आंदोलनात गनिमी कावा वापरला जाणार असल्याचीही चर्चा होती. चार वर्षांपूर्वी जैतापूूर आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे गुरुवारचे कुवारबांवचे आंदोलन शांततेत व्हावे, कायदा व सुव्यवस्था स्थिती बिघडू नये, म्हणून पोलीस व जिल्हा प्रशासनाने कुवारबांव परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कुवारबांव ते आरटीओ चौक या एक किलोमीटर रस्त्यावर रिकामी डांबर पिंंपे व बांबू यांचा दुभाजक बनविण्यात आला होता. एका बाजूने मोर्चेकऱ्यांना मार्ग मोकळा ठेवण्यात आला होता. दुसऱ्या बाजूने दुहेरी वाहतूक सुरू होती. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आंदोलक कुवारबांव येथील डॉ. आंबेडकर भवनाबाहेर रस्त्यावर गोळा होऊ लागले. ११.४५ वाजता आंदोलक मोर्चाद्वारे रस्त्याने चालत अणुऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयाकडे निघाले. त्यांना पोलिसांनी कुुवारबांवमध्येच अडविले. तेथेच १२.१५ वाजता मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे खासदार विनायक राऊत, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, मच्छिमार नेते अमजद बोरकर, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, रत्नागिरी शहरप्रमुख प्रमोद शेरे व अन्य नेते उपस्थित होते. त्यांनी सभेत प्रकल्पाच्या हद्दपारीबाबत जोरदार भाषणे केली.दुपारी १ वाजता सभा संपली व शिष्टमंडळास अणुऊर्जा प्रकल्प कार्यालयात जायचे आहे, असे प्रशासनाला सांगण्यात आले. मात्र, जिल्हा प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी १४४ कलमानुसार तशी परवानगी देता येत नाही, असे सांगितले. यावरून शासकीय अधिकारी व शिवसेना नेत्यांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक झडली. कार्यालयात जाण्यासाठी लोकप्रतिनिधींना अडवू शकत नाही, असे सांगूनही अधिकारी ऐकले नाहीत. त्यामुळे आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलनास बसावे, असे राजन साळवी यांनी सांगितले. त्यामुळे नेत्यांसह सर्वांनीच ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी पोलिसांनी नेत्यांना पकडून जबरदस्तीने बसमध्ये नेले व त्यानंतर ताब्यात घेतलेल्या अन्य आंदोलकांनाही दहा बसेसमधून औद्योगिक वसाहतीतील अन्न महामंडळाच्या वखारीत नेण्यात आले. तेथे त्यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले. या आंदोलनाची स्थिती हाताळण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर, प्रदीप मिसर कार्यरत होते. (प्रतिनिधी) राऊत, साळवींवर कारवाईअटक करण्यात आलेल्यांमध्ये आंदोलनाचे नेते खासदार विनायक राऊत, अमजद बोरकर, संपर्कप्रमुख विजय कदम, आमदार राजन साळवी, बंड्या साळवी, प्रमोद शेरे तसेच अन्य नेत्यांचाही आंदोलनात समावेश होता.पोलीसच अधिकया मोर्चात सहभागी झालेल्यांची संख्या मोठी होती. मात्र, सेनेच्या याआधीच्या आंदोलनामुळे दक्ष झालेल्या पोलिसांनी चांगलाच बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे आंदोलकांपेक्षा पोलीस दुप्पट दिसत होते.
‘जैतापूर’विरोधात सेनेचा हल्लाबोल
By admin | Updated: March 19, 2015 23:51 IST