डिप्पी वांकाणी, मुंबईइराक आणि सीरियात लढणा-या इस्लामिक स्टेट (आयएस) या संघटनेच्या दहशतवाद्यांना इराकी दिनारऐवजी अमेरिकी डॉलरमध्ये मोबदला मिळत असे. संघटनेने इराकी दिनार वापरणे बंद केले आहे, अशी माहिती तेथून परतलेल्या कल्याणमधील आरिफ माजिद याने तपास अधिकाऱ्यांना दिली. अर्थात सूत्रधारांपर्यंत वा तरुणांची माथी भडकविण्याचा संघटित प्रयत्न करणाऱ्यांपर्यंत पोहोचता येईल, अशी कोणतीही माहिती तपास यंत्रणा अद्याप त्याच्याकडून मिळवू शकलेली नाही.किंबहुना तो जुजबी आणि प्रवासवर्णनात्मक माहिती देत तपास यंत्रणांना गुंगारा देत असल्याचा संशय बळावला आहे. म्हणूनच त्याच्या नार्को टेस्टचा आग्रह धरण्याची वेळ आली आहे. त्याच्या समवेत इसिसकडे गेलेल्या अन्य तिघांबाबतही अजून समाधानकारक खुलासा झालेला नाही. सूत्रांनी सांगितले की, या चौघांचे ब्रेनवॉशिंग करणारी कोणी व्यक्ती असल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही. पण त्यांना जाताना निरोप देण्यासाठी दोन जण गेल्याचे समजते. त्यांचा तपास केला जात आहे.इस्लामिक स्टेट सीरिया आणि इराकमध्ये खलिफत स्थापन केल्यानंतर आपले वेगळे चलन सुरू करणार होती. त्यांनी इराकी चलन वापरणे बंद केले आहे. तूर्तास ते अमेरिकी डॉलरमध्ये आर्थिक व्यवहार करीत आहेत. खर्च भागवण्यासाठी संघटनेकडून या लढवय्यांना आठवड्याला ६० ते ७० अमेरिकी डॉलर इतका मेहनताना मिळत असे. स्थानिक प्रवास आणि अन्य खर्च भागवून त्यातीलच काही रक्कम साठवून आपण भारतात परतण्याचा प्रवासखर्च भागवला, असे आरिफने सांगितले. > रकमेची चौकशी आरिफने इराकला जाण्यासाठी काही रक्कम साठवली होती. तसेच त्याने कुटुंबीयांकडून काही रक्कम चोरली होती. यातून त्याने ६० हजार रुपये जमवले. या माहितीची शहानिशा केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरिफ देतोय गुंगारा
By admin | Updated: December 1, 2014 02:54 IST