मुंबई - राज्यातील २ कोटीहून अधिक मुक्या जनावरांना एफएमडी (लाळ्या खुरकत रोगासाठीची लस) देण्यास एक वर्ष विलंब व दिरंगाई झाल्याबद्ल पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत माफी मागितली. पारदशरकतेचा आग्रह व विरोधकांवरील आरोपांची चौकशी करण्याची भूमिका घेणाºया सरकारने मात्र या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी फेटाळून लावल्याने विरोधकांनी सभात्याग केला.मुक्या जनावरांना लसीकरण वेळेवर झाले नाही. लसीकरण देणाºया बायोवेट कंपनीने बंगाल आणि पंजाबला कमी दरात लस उपलब्ध करुन दिली. इतर राज्यात ६ रुपये ३० पैसे दर दिले मग आपल्या राज्याला ७ रुपये ७० पैसे दर का दिला? बायोवेट कंपनीलाच का कंत्राट दिले गेले? याचा सरकारने खुलासा करावा, अशी मागणी विरोधकांनी केल्यानंतर याबद्दल माहिती उपलब्ध नसल्याचे जानकरांनी सांगितले.पशुसंवर्धन विभागाच्या प्रधान सचिवांच्या मागण्याही आयुक्तांनी मान्य केल्या नाही. हा सगळा व्यवहार संशयास्पद आहे. पशुसंवर्धन मंत्र्यांचे खासगी सचिव मुरकुटे, आयुक्त डी.एन.चव्हाण, व उपसचिव गुरव हे दबावतंत्राचा वापर करत आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.तर ज्या इंडियन इम्यूनॉलॉजीकल कंपनीला काम नाकारले गेले ती कंपनी केंद्राचा अंगीकृत उपक्रम असूनही त्यांचे काम डावलले, मंत्र्यांवर संशय असताना पारदर्शकतेच्या गप्पा मारणारे सरकार चौकशी का नाकारत आहे असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
पशुसंवर्धन मंत्री जानकरांनी मागितली माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:28 IST