गांधी विचारधारा विभागाची प्रेरणावाट : विद्यार्थ्यांना मिळतेय संस्कारांचे संचित योगेश पांडे - नागपूरराष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या विचारांनी गेल्या कित्येक दशकांपासून संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आहे. परंतु केवळ विचार आत्मसात केल्याने या महात्म्याची ओळख होत नाही. तर त्यांच्या संस्कारांचे खरे सामर्थ्य विचारांना आचारात आणल्यावर समजते. विचारांचेदेखील ‘मार्केटिंग’ करण्याच्या या युगात नागपूर विद्यापीठातील गांधी विचारधारा विभागात मात्र गांधींचे विचार प्रत्यक्ष आचरणातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न दिसून येतो. ‘पॅकेज’च्या स्पर्धेतदेखील या संचित विचारांची शिदोरी विद्यार्थ्यांना या विभागापर्यंत खेचून आणते. सूतकताई, सर्वधर्मसमभाव प्रार्थना अन् समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गांधी विचारांची शिकवण देणारा हा राज्यातील एकमेव विभाग आहे हे विशेष.सूतकताई अन् ‘वैष्णव जन तो...‘चे सूरविभागातील वर्ग हे दररोजी सायंकाळच्या सुमारास भरतात. सायंकाळच्या वेळेस महात्मा गांधी सर्वधर्मसमभाव प्रार्थना आवर्जून म्हणायचे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत या विभागात सायंकाळी ठीक ५.४५ वाजता ‘वैष्णव जन तो तेने कहिये...’ या बापूंच्या प्रिय भजनासोबतच सर्वधर्मसमभाव प्रार्थनेचे सूर उमटतात. या वेळी केवळ विद्यार्थी व शिक्षकच नव्हे तर परिसरातील नागरिकदेखील उपस्थित असतात. सूतकताई गांधी विचाराच्या प्रसारासाठी सुलभ माध्यम असल्याचे मानण्यात येते.विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमादरम्यान प्रत्यक्ष सूतकताईदेखील करावी लागते. या उपक्रमासाठी विभागात सुमारे डझनभर अंबर चरखेदेखील आहेत.
गांधीविचारांसोबतच आचारांचाही अनुनय
By admin | Updated: January 30, 2015 00:57 IST