पुणे : फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आणखी एका जखमीच्या शरिरातून शस्त्रक्रिया करून छर्रे काढण्यात आले आहेत. त्यांची जखम बरी होत नसल्याने एक्स-रे काढण्यात आला असता आत छर्रे असल्याचे आढळून आले.गेल्या गुरुवारी दुपारी झालेल्या या स्फोटामध्ये ५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यापैकी माताप्रसाद सिंग याच्या डोक्यात छर्रे घुसले होते, मात्र ससून हॉस्पिटलमधील सीटीस्कॅन मशीन बंद असल्याने त्याची तपासणी न करताच मलमपट्टी करून त्याला सोडण्यात आले होते. त्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करता त्याच्या डोक्यात छर्रे असल्याचे आढळून आले. श्री समर्थ वडापाव सेंटरच्या मालकीण मनीषा जाधव या स्फोटामध्ये किरकोळ जखमी झालेल्या होत्या, त्यांच्या उजव्या पायाला जखम झाली होती. त्यांनी त्या जखमेवर मलमपट्टी करून घेतली, मात्र जखम बरी होत नसल्याने त्यांनी पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखविले. त्यावेळी त्यांच्या जखमेचा एक्स-रे काढण्यात आला तेव्हा आत छर्रे असल्याचे आढळून आले. छोटी शस्त्रक्रिया करून छर्रे काढण्यात आले आहे. तपास करीत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सतेज पाटील यांनी तपासाची माहिती घेतली. गणेशोत्सवापूर्वी फरासखाना, विश्रामबाग, शिवाजीनगर, कोथरूड, वारजे माळवाडी, डेक्कन, खडक (झोन १) परिसरामध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सतेज पाटील म्हणाले. (प्र्रतिनिधी)
आणखी एका जखमीच्या शरीरातून काढले छर्रे
By admin | Updated: July 16, 2014 01:49 IST