औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) आणि वंचित बहुजन आघाडीत विधानसभेच्या तोंडावर बेबनाव निर्माण झाला आहे. जागा वाटपावरून दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. एमआयएमचे बदलते रंग लक्षात घेऊन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाच्या दृष्टीने व्यूव्हरचना आखण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.लोकसभा निवडणुकीत एमआयएम-बहुजन वंचित आघाडीने एकत्र येत निवडणुका लढविल्या. औरंगाबाद वगळता या आघाडीला कुठेच यश मिळाले नाही. वंचितने साथ दिल्यामुळे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील निवडून आले. अकोला, सोलापूरमध्ये वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना एमआयएमकडून जशी साथ हवी तशी मिळाली नाही, तेव्हापासून दोन्ही पक्षांतील दुरावा हळूहळू वाढत चालला आहे. या दुराव्यात तेल ओतण्याचे काम अलीकडे एमआयएमकडून झाले. औरंगाबाद शहरातील तिन्ही मतदारसंघांवर एमआयएमने दावा ठोकला. दुसऱ्याच दिवशी वंचितच्या स्थानिक नेत्यांनी यावर रोष व्यक्त करीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय खा. असदोद्दीन ओवेसी, प्रकाश आंबेडकर दोघे घेतील. इतर कोणीही यात हस्तक्षेप करू नये, अशी प्रतिक्रिया दिली.मुस्लीम समाजालाही मानाचे स्थानएकीकडे जागा वाटपावरून दोन्ही पक्षांतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत असताना प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम मतदान एमआयएममुळे पडत नाही, मुस्लिम धर्मगुरू जे सांगतील तेच होते, असे विधान केले. औरंगाबाद शहरातील काही मुस्लिम धर्मगुरूंची भेटही त्यांनी घेतली.
‘एमआयएम’शी बेबनाव, ‘वंचित’कडून स्वबळाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 23:49 IST