खासदार गीते यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यासही तांत्रिक कारणास्तव विलंब झाला. गुहागर आणि दापोली येथील दोन मतदान यंत्रांत मोजणीच्यावेळी बिघाड निर्माण झाला. अभियंत्यानी एका यंत्रातील डेटा परत मिळवण्यात यश मिळवले परंतु दुसर्या यंत्रांतील डेटा परत मिळवता आला नाही. या मुद्यावरुन फेरमतमोजणीच्या बातम्याही तत्काळ सर्वत्र पसरल्या परंतु कोणाही उमेदवाराने फेरमतमोजणीची मागणी केली नाही. दरम्यान, हा विषय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे दिल्लीस निर्णयार्थ रायगडचे निवडणूक निर्णय अधिकारी सुमंत भांगे यांनी पाठविला, त्यावर तब्बल दीड तासाने ते यंत्र गोठवून अंतिम निर्णय देण्याचे आदेश आले आणि रायगडचे निवडणूक निर्णय अधिकारी सुमंत भांगे यांनी शिवसेना उमेदवार खासदार अनंत गीते यांच्या विजयाची घोषणा केली आणि मतदान केंद्र परिसरासह संपूर्ण मतदार, शिवसैनिक व भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. रायगड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता पक्षीय कार्यकर्त्यां बरोबरच आमजनतेस लागून राहिली होती,सकाळीच सात वाजल्यापासून प्रत्येक उमेदवाराच्या गावोगावातील कार्यकर्त्यानी हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. या निकाला दरम्यान मतमोजणी केंद्राच्या आवारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रायगड पोलिस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अलिबाग - पेण रस्त्याच्या गोकुळेश्वर मार्गे नेहुली येथील मैदानावर मतमोजणीच्या ठिकाणी जाण्याच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त करण्यात आले होते . सदरील मार्ग एकतर्फी ठेवण्यात आला होता. जेणेकरुन गर्दी होणार नाही तसेच निवडणूक निकालासाठी आमदार, व्ही आय पी , कार्यकर्ते आणि निवडणूक निकालाच्या कर्मचार्यांच्या वाहनांची सोय वेगवेगळी ठेवण्यात आली होती. मुख्य द्वारापासून ज्या व्यक्तीकडे निवडणूक अधिकार्यांकडून दिलेले ओळखपत्र असेल अशांनाच प्रवेश दिला जात होता त्यामुळे बाहेरील वातावरण अगदी शांत होते. जमलेले हजारो कार्यकर्ते उन्हातान्हाची पर्वा न करता आपल्या उमेदवाराच्या निकालांचे उत्सुकतेने वाट पाहत होते. स्पीकरमधून प्रत्येक फेरीचे निकाल जाहीर करण्यात येत होते त्याबरोबर जल्लोष होत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी आपला पराभव शांतपणे मान्य करुन, प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अभिनंदन करुन आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शांतपणे मतदान केंद्रातून निघून जाणे पसंत केले. जाताना ते आपल्या कार्यकर्त्यांची पाठ थोपण्यास मात्र विसरले नाहीत. पत्रकारांना देखील त्यांनी शांतपणे प्रतिक्रिया देवून पराभव मान्य केला आणि मतदारांचे आभार देखील व्यक्त केले. सायंकाळी विजयी उमेदवार शिवसेनेचे अनंत गीते यांनी मतदान मोजणी केंद्रातून बाहेर येऊन सकाळपासून आभार मानले. तसेच आचारसंहिता असल्यामुळे आपण मिरवणूक काढायची नाही असे जाहीर त्यांनी केले. तालुकावाईज सभा घेवून मिरवणूक काढण्यात येईल. महाराष्ट्रामध्ये जनतेने दिलेल्या विश्वासाला आपण जागृत राहून भ्रष्टाचाराला या रायगडच्या लाल मातीत गाडून टाकू. जमलेल्या कार्यकर्र्त्यांनी पुष्पहार घालून गीते यांचे अभिनंदन केले. विरोधकांना अपशब्द व अनुचित प्रकार न करण्याचे आवाहन त्यांनी अखेरीस कार्यकर्त्यांना केले .
अन् गीतेंच्या नावावर विजयी मोहरा पडला...
By admin | Updated: May 17, 2014 01:16 IST