मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन कराणाऱ्यांविरोधात परिवहन आणि पोलीस विभागाकडून आजपासून (बुधवार) धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेदरम्यान दोषी वाहनचालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. रस्ता सुरक्षा अभियान आणि वाहतुकीच्या नियमांबाबत रावते यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभाग आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात पार पडली. या वेळी मुंबईसह बृहन्मुंबई क्षेत्रातील ठाणे, कल्याण, बोरीवली, नवी मुंबई, वसई आदी भागांमध्ये धडक मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लाल सिग्नल तोडून जाणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे, चालविताना मोबाइल वापरणे असे नियम तोडणाऱ्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार असल्याचे रावते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
...तर तीन महिन्यांसाठी परवाना रद्द - रावते
By admin | Updated: January 6, 2016 01:41 IST