ऑनलाइन लोकमत
भगवानगड, दि. ३ - भाजपने पहिल्यांदाच ओबीसी नेत्याला पंतप्रधान केले आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजानेही पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित व्हावे असे आवाहन करत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे.
पंकजा मुंडे यांच्या प्रचाराची शुक्रवारी भगवनागड येथून सुरुवात झाली. या सभेत भाजपाध्यक्ष अमित शहा बोलत होते. गोपीनाथ मुंडे यांना ग्रामीण भागातील जनतेची जाण होती व त्यासाठीच त्यांच्याकडे ग्रामविकास खात्याचा कार्यभार दिला होता अशी अमित शहा यांनी आवर्जून सांगितले. मुंडेसाहेबांचे स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी ओबीसी समाजाने पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा अशा घोषणा या सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या. महादेव जानकर यांनीही भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी पंकजा मुंडे यांचा चेहरा पुढे करावे अशी मागणी केली. याविषयी अमित शहा म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय चालू आहे हे आम्हाला माहित आहे. पंकजा मुंडेंच्या विनंतीनंतर भगवानबाबांच्या सुवर्ण जयंतीनिमित्त भगवान गडावर येतीलच असे शहा यांनी सांगितले.