मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी मेजर (निवृत्त) रमेश उपाध्यायला शनिवारी विशेष एनआयए न्यायालयाने उत्तर प्रदेश विधासभा निवडणूक लढवण्याची परवानगी दिली, तसेच निवडणुकीच्या कामासाठी तीन आठवड्यांचा जामीनही मंजूर केला.सत्र न्यायालयाने उपाध्यायला अनेक अटी घालत, त्याला निवडणुकीच्या कामासाठी तीन आठवड्यांचा जामीन मंजूर केला, असे एनआयचे वकील अविनाश रसाळ यांनी सांगितले. अखिल भारत हिंदू महासभा या पक्षाने उपाध्यायला तिकीट दिले आहे. बल्लीया जिल्ह्यातील बरीआमधून तो निवडणूक लढवणार आहे. २० जानेवारी रोजी विशेष न्यायालयाने उपाध्यायला निवडणुकीसाठी नामनिर्देशित अर्ज भरण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर, त्याने निवडणुकीच्या कामासाठी व प्रचारासाठी काही दिवस उत्तर प्रदेशमध्ये जाण्याची मुभाही न्यायालयाकडून मागितली होती.उपाध्यायच्या अर्जावर एनआयएने काहीही हरकत न घेतल्याने, विशेष न्यायालयाने त्याला तीन आठवड्यांसाठी उत्तर प्रदेशला जाण्याची परवानगी दिली. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटात काही लोक मृत्युमुखी पडले, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले. (प्रतिनिधी)
आरोपीला निवडणूक लढवण्यास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 00:41 IST