पुणे : सात-बारा उतारे, लिज अॅग्रिमेंट आदी दाखल्यांबरोबरच खरेदी-विक्री व्यवहारही १ एप्रिल २०१५ पासून आॅनलाईन पद्धतीने होतील. त्यामुळे सर्वसामान्यांना महसूल विभागाकडील विविध दाखले घरबसल्या मिळू शकतील, असे प्रतिपादन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भोर येथे बोलताना केले.राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत भोर तालुका ई-फेरफार योजनेचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. राज्यात आता ई-चावडी, ई-फेरफार योजनांद्वारे सर्व ठिकाणी महसूल विभागात ई-गव्हर्नन्स प्रणाली राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भोर येथे प्रशासकीय इमारतीसाठी विशेष बाब म्हणून पाच कोटी रुपये निधी दिला जाईल. भाटघर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी जातीने लक्ष घालून प्रयत्न करेन, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)