नागपूर : विविध स्थानिक संस्थांचे योग्य नियोजन हा जगभरातील एक मोठा प्रश्न आहे. या नियोजनातूनच विकासाचे शिखर सहजपणे गाठता येते. सुशासन देणे ही केवळ प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर नागरिकांचादेखील त्यात उत्स्फूर्त सहभाग हवा. अशा प्रकारच्या एकत्रित प्रयत्नांतूनच सर्वांगीण विकास होऊ शकतो, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. नागपूर महानगरपालिकेचा १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा सोमवारी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात थाटात पार पडला. या वेळी राष्ट्रपती मुखर्जी बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यपाल सी.विद्यासागर राव होते. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अन्य मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी गौरव गं्रथाचे प्रकाशन राज्यपाल राव यांच्या हस्ते झाले.राष्ट्रपती म्हणाले, जगातील अनेक देशांमध्ये शहरीकरणाची प्रक्रिया अनेक दशके किंवा शतके चालली. औद्योगिक क्रांतीचीदेखील त्यांना मदत मिळाली. परंतु आपल्या देशाला त्या मानाने फारच कमी वेळ मिळाला. त्यामुळे शहरीकरणासोबत विकासाचा वेग वाढविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे व त्यासाठी एकत्रित प्रयत्नच करावे लागणार आहेत. खा. कृपाल तुमाने, खा. अजय संचेती, पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर, आ. कृष्णा खोपडे यांसह विविध मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.नागपूरला करायचेय ‘रोल मॉडेल’- नागपूरला ‘मिनी’ भारताचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहराची ओळख संत्रानगरी, हिरवेगार शहर अशी आहे. आता देशातील शैक्षणिक ‘हब’ व उद्योगांचे शहर अशी नवीन ओळख प्रस्थापित करायची आहे. हे शहर देशासाठी ‘रोल मॉडेल’ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
एकत्रित प्रयत्नांतूनच होईल सर्वांगीण विकास
By admin | Updated: September 15, 2015 01:43 IST