सगळ्या वर्तमानपत्रात देवेंद्र फडणवीस सरकारला शंभर दिवस झाल्याच्या बातम्या आल्या. जाहीराती आल्या. लोकमतने मंत्र्यांचे प्रगती पुस्तक छापले. ते नेमके अलियाने पाहिले. तीने लगेच तिच्या पप्पाला म्हणजे भटना विचारले... आलिया : डॅड, शंभर दिवस म्हणजे किती...?पप्पा : बेबी... इटस् हंड्रेड डेज... तुझा एकपण मुव्ही हंड्रेड डेज पूर्ण करु शकलेला नाही अजून...आलिया : डॅड... त्यांना फक्त फोर, फाईव्ह, सिक्स असे मार्क भेटलेत... मला तर आउट आॅफ हंड्रेड थर्टी फोर भेटले होते...पप्पा : तू ते काहीही वाचू नकोस... त्यापेक्षा करण जोहरचा एआयबी शो पहात बस...आलिया : डॅड, शो तर भन्नाट होता... त्यात करणला आउट आॅफ हंड्रेड वन हंड्रेड अॅन्ड टेन भेटले पाहिजे... पप्पा : तू काय डोक्यावर पडली होतीस का... आलिया : नो डॅड... डोक्यावर नाही पण बेडवरुन पडले होते काल... बट ते महत्वाचं नाही ना डॅड... मला सांगा हंड्रेड डेज मधे काय काय केले देवेंद्र अंकलनी...पप्पा : अग ते यंग आहे, त्याना अंकल नको म्हणूस... आलिया : डॅड त्यांचे कपडे तर अंकल सारखेच असतात ना... बट टेल मी; त्यांनी काय केले हंड्रेड डेजमधी...पप्पा : खूप कामं केली बेटा... त्यांच्या मुलीला मुंबईच्या शाळेत पटकन अॅडमिशन मिळवून दिली... त्यांच्या मिसेसची मुंबईत बदली करुन घेतली... नागपूरहून मुंबईत घर शिफ्ट केलं... दुसऱ्या कोणाला या तीन कामातच थ्री हंड्रेड डेज लागले असते... तरीही काम झालं असतं की नाही माहिती नाही...आलिया : वॉव... दॅट्स ग्रेट... बट डॅड... अजून काय काय काम केले देवेंद्र अंकलनी?पप्पा : खूप अनाऊन्समेंट केल्या... मंत्रालयात एंट्रीसाठी मोबाईलवरुन पास घेता येईल... एरिगेशनची चौकशी करणार... अशा कितीतरी...आलिया : अय्या... डॅड ते रेडिओ जॉकीपण आहेत...पप्पा : नाही गं... त्याचा काय संबंध येथे...आलिया : तुम्हीच तर म्हणालात ना त्यांनी किती तरी अनाऊन्समेंट केल्या म्हणून...पप्पा : देवा रे देवा... अगं बाई तुला कळावं म्हणून म्हणालो, अनाऊन्समेंट म्हणजे घोषणा. खूप घोषणा केल्या आहेत त्यांनी...आलिया : डॅड, त्यांनी अमिताभ बच्चन, मधुर भंडारकर अशा आपल्या फिल्मी लोकांना डे टाईमला का पार्टी दिली ताज मधे... पप्पा : पार्टी नव्हती ती... देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई नेक्स्ट चा प्रोग्राम होता... आलिया : वॉव... अमित अंकलला घेऊन देवेंद्र अंकल नवीन प्रोग्राम करणार आहे का कोणत्या चॅनलवर...पप्पा : नाही गं बाई... मुंबईत काय काय करायचं त्यासाठी डिस्कशन होतं तीथे...आलिया : त्यांनी घर केलं, त्यांच्या डॉटरला अॅडमिशन दिली, वाईफची बदली केली... अनाऊन्समेंटपण केल्या... आता कशाचं डिस्कशन...? ते नक्की पिक्चर करणार असतील...पप्पा : तू आता जा... मला स्क्रीप्ट वाचायची आहे नव्या पिक्चरची...आलिया : डॅड, हे पहा... सम नेमाडे म्हणून आहे कोणी त्यांना ज्ञानपीठ भेटला म्हणे... कोण आहे हे... आणि त्यांना भेटला म्हणजे आपल्याला पण भेटणार का ज्ञानपीठ... (महेशजीनी आलियाला रुममध्ये ढकलले आणि दरवाजा बंद करुन ग्लास जवळ घेतला...)अतुल कुलकर्णी