ऑनलाइन लोकमत
तुळजापूर, दि. 9 - शारदीय नवरात्रोत्सवातील रविवारी नवव्या माळेनिमित्त श्री तुळजाभवानी मातेची विशेष महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. या आगळ्या-वेगळ्या व नवरात्रीतील आसुरांच्या युध्दातील शेवटचा दिवस म्हणून या विशेष महापुजेची मांडणी करण्यात येते. हजारो भाविकांनी या महापुजेचे दर्शन घेऊन ‘आई राजा उदो उदोऽऽ’ चा जयघोष केला.रविवारी मध्यरात्री एक वाजता चरणतीर्थ सेवाविधी पार पडल्यानंतर दीडवाजता भाविकांना धर्मदर्शन व मुखदर्शन रांगेतून देवी दर्शनासाठी सोडण्यात आले. सकाळी सहा वाजता घाट होवून नित्योपचार पंचामृत अभिषक सुरू झाले. अकरा वाजता अभिषेकाची सांगता झाली. यानंतर नैवेद्य, आरती विधी पार पडले. दुपारी १२ वाजता भोपे पुजारी संजय सोंजी, अतुल मलबा, सुरेश परमेश्वर, शशिकांत पाटील व महंत यांनी श्री तुळजाभवानी मातेची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडली. या पुजेत देवीस एक १०८ पदकांची दोन पदरी शिवकालीन व एक सहा पदरी पदकी अशा दोन पुतळ्याच्या माळा, सोन्याचे हात, सोन्याच्या पादुका, हिरे, मोती, पाच माणिक, रत्न यांचा सोनेरी मुकूट, त्यावर सोनेरी छत्री यासह इतर सोन्याच्या दागिन्यांच्या समावेश होता. पुजेमध्ये देवीच्या हाती चांदीचा त्रिशाुळ, चांदीचा दैत्य, अर्धअवस्थेतील रेडा आदींचाही समावेश होता. श्री तुळजाभवानी माता नऊ दिवस आसुरांबरोबर युध्द करते तर शेवटच्या दिवशी महिषासूर रेड्यावर स्वार होवून देवीशी युध्द करतो. परंतु, यात तो पराजीत होतो. त्यावर महिषासूर तुळजाभवानीला शरण येतो व देवीला तिच्या चरणी आश्रय मागून तुमच्याबरोबर मलाही माझ्या नैवेद्याचा मान द्या, यात प्रथम तुमचा व त्यानंतर माझा मान, अशी विनंती करून देवीस शरण जातो. यानंतर नऊ दिवस चाललेल्या युध्दाचीसांगता होते, अशी या पुजेची अख्यायिका असल्याचे पुजारी युवराज साठे यांनी सांगितले.