हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. आसामचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि सर्व भाजप नेत्यांमध्ये भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना थांबवण्याची हिंमत नाही का? असे थेट सवाल ओवैसी यांनी एका सभेला संबोधित करताना केला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी २६ निरपराध नागरिकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. जर तुमच्या मुलीचा मृत्यू झाला असता, तर तुम्ही पाकिस्तानसोबत सामना खेळला असता का?" असाही संतप्त सवाल त्यांनी केला.
"भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना झाला तर, ६००-७०० कोटी रुपये मिळतील. पण भाजप नेत्यांनी सांगावे की, देशाच्या नागरिकांच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे का? देशभक्तीच्या गप्पा मारणाऱ्यांनी मुठभर पाण्यात बुडून मरावे", असा घणाघात ओवैसी यांनी केला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत, चर्चा आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाहीत, मग भारत पाकिस्तान सामन्यातून मिळणारे २०००- ३००० कोटी रुपये आपल्या २६ नागरिकांच्या जीवापेक्षा जास्त मौल्यवान आहेत का?" असाही त्यांनी सवाल केला. पुढे ओवैसी म्हणाले की, "पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्यांसोबत आम्ही कालही होतो, आजही त्यांच्यासोबत आहोत आणि उद्याही त्यांच्यासोबत राहू".