चासकमान : चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले दुसरे आवर्तन शनिवारी रात्री ९ वाजता बंद करण्यात आले. चासकमान धरणात सध्या ३६.८१ टक्के पाणी साठा शिल्लक राहिला आहे. खेडसह शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १२ जानेवारी रोजी रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते, अशी माहिती शाखा अधिकारी यू. एम. राऊत यांनी दिली.या आवर्तनाचा खेडसह शिरूर तालुक्यातील कांदा, बटाटा, गहू, ज्वारी, हरभरा, मेथी, आदी पिकांना फायदा झाला. ठरलेल्या नियमानुसार कालव्यातून सोडलेले आवर्तन बंद करण्यात आले आहे. चासकमान डाव्या कालव्यातून पाण्याची मोठ्याप्रमाणात गळती होत असून, शेतजमिनी नापीक झाल्या आहे. अस्तिकरण न झाल्याने पाण्याची नासाडीही मोठ्याप्रमाणात होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. या धरणातील पाण्याचा फायदा खेड, शिरूर तालुक्याला झाला. गेली अनेक वर्षे डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाते, मात्र ते पूर्ण क्षमतेने सोडले जात नाही. कारण, या कालव्याचे अस्तिकरणच झाले नाही. जर पूर्ण क्षमतेने पाणी सोडले तर कालवाफुटीची शक्यता आहे. असे वेळोवेळी प्रकारही घडले आहे. त्या मुळे कालव्यातून पाणी जरी सोडले, तर शिरूर तालुक्यात जाण्यासाठी मोठा कालावधी लागतो. या दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात गळती होत असते. त्यामुळे परिसरात जमिनीत पाणी साचून शेतजमिनी नापीक झाल्या आहे. तसेच, डाव्या कालव्यावर अनेक गावांना, वस्त्यांना जाणाऱ्या मार्गावर लोखंडी पूल टाकण्यात आले आहे. मात्र, ते नादुरुस्त होऊन धोकादायक झाले आहे. त्यामुळे पुढील आवर्तन सोडताना दुरुस्ती व योग्य पाण्याचे नियोजन करून पुढील आवर्तन सोडावे. (वार्ताहर)जानेवारी महिन्यात धरणाचे पाणी सोडले, त्या वेळी चासकमान धरणामध्ये ७०.८४टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षी याच तारखेला चासकमान धरणामध्ये २५.८३टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ११टक्के पाणीसाठा जादा शिल्लक आहे.चासकमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाणी सोडताना विश्वासात घेण्याची मागणी होत आहे, यामुळे पाण्याची नासाडी होणार नाही. मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे चासकमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. तसेच, धरणाकाठच्या गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या मुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिक करत आहे. चासकमान धरणातून शुक्रवारी रात्री १२वाजता पाणी बंद करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या आदेशाने ते शनिवारी पुन्हा सोडण्यात आले होते. नंतर रात्री पुन्हा ९ वाजता बंद करण्यात आले.
दोन महिन्यांनंतर आवर्तन बंद
By admin | Updated: March 6, 2017 01:24 IST