राजेश निस्ताने - यवतमाळराज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला तब्बल अडीच वर्षानंतर सचिव लाभला आहे. डझनावर न्यायालयीन अडथळे पार केल्यानंतर मंगळवारी अखेर व्ही.आर.नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. धनंजय धवड सेवानवृत्त झाल्यापासून (अडीच वर्षे) बांधकाम खात्यातील (रस्ते) सचिवाचे पद रिक्त होते. सेवाज्येष्ठता आणि आरक्षण बिंदूनुसार व्ही.आर.नाईक या पदासाठी पात्र असताना त्यांच्या नियुक्तीत अडचणी निर्माण केल्या गेल्या. त्यासाठी मुंबई औरंगाबाद उच्च न्यायालय, मुंबई ‘मॅट’ (महाराष्ट्र प्रशासकीय लवाद) येथे ८ ते १0 वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या. या सर्व याचिकांचे निकाल अंतत: नाईक यांच्या बाजूने लागले. अखेर मंगळवारी मुंबईच्या विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता नाईक यांच्या बढतीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली. ते रस्ते विभागाचे सचिव म्हणून पुढील साडेपाच वर्ष राहणार आहे. नाईक यांच्या या नियुक्तीवर मुंबईतील मुख्य अभियंता तामसेकर यांचा आक्षेप आहे. शासनाने मुख्य अभियंत्यांची ज्येष्ठता यादी लावली नाही, जी लावली ती चुकीची लावल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र मुळात स्वत: तामसेकर यांच्याकडे सहा ते आठ महिने सचिवाचा अतिरिक्त प्रभार असताना त्या काळात त्यांनी ही ज्येष्ठता यादी का लावली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात सचिवाचेपद रिक्त असताना तीन वर्षांपूर्वी धनंजय धवड यांना अतिरिक्त प्रभार देण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यावेळी काही मुख्य अभियंत्यांनी बांधकाम मंत्र्यांना भेटून या प्रभाराला विरोध केला होता. त्यानंतर सेवा ज्येष्ठ असलेल्या धनंजय धवड यांना डावलून कनिष्ठ असलेल्या मुख्य अभियंता तामसेकर यांच्याकडे हा प्रभार दिला गेला होता.
सार्वजनिक बांधकाम खात्याला अडीच वर्षानंतर सचिव मिळाला
By admin | Updated: June 4, 2014 01:04 IST