कॉंग्रेसने पालघर लोकसभा मतदारसंघात प्रचंड हाराकिरी केली. प्रचार मध्यावर आलेला असताना आपले राज्यमंत्री राजेंद्र गावित यांची उमेदवारी मागे घेऊन बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याची खेळी खेळली. काँग्रेसचा उमेदवार नसला की भाजपाचा आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात सरळ लढत होईल व जाधव पुन्हा विजयी होतील. असे सत्तेचे साधे गणित काँग्रेस व आघाडीने मांडले; परंतु बविआची मदार नालासोपारा, वसई अशा शहरी पॉकेटस्वर होती तर वनगांचा भर आदिवासी मतदारांवर होता. पालघर नगरपालिका निवडणुकीत बविआच्या २१ उमेदवारांचे जप्त झालेले डिपॉझिट आणि वसई विधानसभा मतदारसंघात बबिआचा झालेला पराभव तिथे झालेला शिवसेनेच्या विवेक पंडित यांचा विजय याबाबी बबिआचा घटता प्रभाव स्पष्ट करणार्या होत्या. त्यामुळे अधिक सावध अशी व्यूहरचना करण्यावर बविआने भर दिला नाही, तर दामू शिंगडा यांनी पुकारलेले बंड व श्रेष्ठींचा आदेश धुडकावून त्यांचा पुत्र सचिन याने माघारीची मुदत टळून गेल्यानंतर ही उमेदवारी कायम ठेवणे, त्यातून मतदारांना गेलेला चुकीचा संदेश या सगळ्याची किंमत आघाडीला मोजावी लागली. येथे राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने बविआच्या उमेदवाराच्या पाठीशी सर्व ताकद उभी केलीच नाही. एकीकडे अशी अवस्था असताना दुसरीकडे वनगांचीही अवस्था फारशी काही चांगली नव्हती. पक्षाचा एकही मोठा नेता प्रचारास आलेला नाही. पक्षाने पाठविलेला निधी प्रमुख मातब्बरांनी पोहचूच दिला नाही. अशा स्थितीत त्यांची ही नौका दोलायमान होती. परंतु, मतदार मोदी लाटेवर स्वार झाले आणि त्यांनी वनगांना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करणारा कौल दिला. यावरून आघाडीला आणि काँग्रेस व राष्ट्रवादीला येथे संघटन बळकट करण्याचा संदेश मतदारांनी दिला आहे हे स्पष्ट होते.
अखेर शिट्टी वाजलीच नाही
By admin | Updated: May 17, 2014 02:02 IST