मुंबई : गेला दीड महिना अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दहीहंडी उत्सव आता ‘वादमुक्त’ झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीसंदर्भात दिलेली स्थगिती गोविंदा पथकांसाठी दिलासादायक असून, सर्वच गोविंदा पथकांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येते आहे. यंदाचा दहीहंडी उत्सव पुन्हा एकदा जल्लोषात साजरा होणार असून, उत्सवावरचे वादाचे सावट पूर्णपणे नाहीसे झाले आहे.गोविंदा पथकांमध्ये १८ वर्षांखालील गोविंदांच्या सहभागाला तसेच २० फुटांहून अधिक थर रचण्याला बंदी घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यामुळे गोविंदा खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे हास्य उमटले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे आता गोविंदा पथके उंच थरांच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. याविषयी दहीहंडी समन्वय समितीचे उपाध्यक्ष सुरेंद्र पांचाळ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून सुरक्षा उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणार आहोत. त्यासाठी सर्वच गोविंदा पथकांना समन्वय समितीच्या वतीने ‘एक थर कमी लावा, मात्र अपघात टाळा’ असे आवाहनही करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती म्हणजे आमच्या परंपरेचा विजयच आहे. आज खूप आनंद होतो आहे. शिवाय, यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही हेल्मेट्स, बेल्ट्स खेळाडूंना देणार आहोत. तसेच, थरांवर चढतील त्याचप्रमाणात खाली थरांना आधार देण्यासाठी अधिक गोविंदा खेळाडू असतील याची दक्षताही घेऊ जाईल, असे दहीहंडी समन्वय समितीच्या सचिव गीता झगडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अखेर फुटली वादाची हंडी!
By admin | Updated: August 15, 2014 02:58 IST