ठाणो : एमएमआरडीएच्या रेंटल हाऊसिंग योजनेला अपेक्षित यश मिळत नसल्याने अखेर राज्य शासनाने ही योजना गुंडाळली असून आता ठाणो आणि रायगडसाठी किफायतशीर घरांची योजना पुढे आणली आहे. मागील आठवडय़ात यासंदर्भातील धोरण मंजूर झाले आहे. या धोरणातून दाटीवाटीचे क्षेत्र वगळण्यात आले असून किमान चार हजार चौरस मीटरवर तीन एफएसआय दिला जाणार आहे. या योजनेनुसार नागरिकांना 269 चौरस फुटांची घरे उपलब्ध होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेला यामध्ये अंमलबजावणी प्राधिकरण असणार आहे.
विशेष म्हणजे यासंदर्भातील प्रस्ताव यापूर्वीच ठाणो महापालिकेच्या महासभेत जून महिन्यात मंजूर झाला असून तो अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. आता राज्य शासनाने हे धोरणच मंजूर केल्याने ठाणो महापालिका याबाबतीत आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या धोरणानुसार खाजगी विकासकाला 3 (एफएसआय) चटई क्षेत्र मिळणार आहे. त्यातील एक चतुर्थाश क्षेत्रफळावर त्याला ही योजना राबवायची असून उर्वरित तीन चतुर्थाश क्षेत्रफळ हे त्याला वापरण्यास मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतील 25 टक्के घरे महापालिकेस मोफत मिळणार आहेत.
रेंटल हाऊसिंग योजना किफायतशीर हाऊसिंगमध्ये रूपांतरित करण्याची शिफारस राज्य सरकारच्या वतीने नेमलेल्या समितीच्यावतीने करण्यात आली होती. (प्रतिनिधी)