मुंबई : अकरावीच्या आॅनलाईन नोंदणीत अर्धवट अर्ज भरलेल्या किंवा अर्जच भरले नसल्याने प्रक्रियेपासून बाहेर राहिलेल्या ८ हजार २४३ विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांत अर्ज केले आहेत. सोमवार व मंगळवारी या विद्यार्थ्यांसाठी अर्ज नोंदणी करण्याची संधी उपसंचालक कार्यालयाने दिली होती. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ४ आॅगस्टला जाहीर होणार असून ५ व ६ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येईल.याआधी मुंबई महानगर क्षेत्रातून एकूण २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यातील एकूण १ लाख २३ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केलेला आहे. तर नव्याने अर्ज केलेल्या ८ हजार २४३ विद्यार्थ्यांमुळे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आत्ता २ लाख ३० हजार ८६५ च्या घरात गेली आहे. दरम्यान, अर्ज भरताना उपसंचालक कार्यालयाने याआधी जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीतील दुसऱ्या कट आॅफचे बंधन घातले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पर्याय निवडताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या. काही विद्यार्थ्यांना मिळालेले गुण दुसऱ्या कट आॅफहून कमी होते. या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, त्यांना अखेरची संधी ५ व ६ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विशेष फेरीत मिळणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज केलेल्या नाहीत, त्यांनी विशेष फेरीदरम्यान अर्ज करण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)>विशेष फेरीतील अर्ज वाढणारयाआधी अर्धवट अर्ज भरलेल्या किंवा चूकीचा अर्ज भरल्याने प्रवेशप्रक्रियेबाहेर राहिलेल्या विद्यार्थ्यांना सोमवार व मंगळवारी विशेष संधी देण्यात आली होती.या संधीचा फायदा ८ हजार २४३ विद्यार्थ्यांनी करून घेतला आहे. ९५९ विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्धवट अर्ज भरल्याचे निदर्शनास आले आहे.२४४ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले असून ते कन्फर्म केलेले नाहीत.३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी अर्ज कन्फर्म केल्यानंतर अप्रूव्ह केलेले नाहीत.३ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज अर्धवट भरलेला आहे.१,०६० विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज पूर्ण भरल्यानंतरही कन्फर्म केला नव्हता.विशेष फेरीत हजारो विद्यार्थ्यांची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अकरावीच्या आॅनलाइन नोंदणीचा फायदा
By admin | Updated: August 3, 2016 02:19 IST