ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. २१ - लालकृष्ण आडवाणींनी आणीबाणी संदर्भात केलेले विधान मोदी सरकारने गांभीर्याने घ्यावे असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला काढला आहे. सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पानं पुसली असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.
सांगलीत अंजनी गावातील एका कार्यक्रमात आलेल्या शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. लालकृष्ण आडवाणी यांनी एका मुलाखतीमध्ये देशात पुन्हा आणीबाणी लागू होऊ शकते असे विधान केले होते. यावरुन पवार यांनी मोदी सरकारला टोला लगावला. लालकृष्ण आडवाणींचे विधान गांभीर्याने घ्यावे असे त्यांनी मोदी सरकारला उद्देशून म्हटले आहे. ऊस उत्पादक शेतक-यांना दिलेली मदत फसवी असून खरीप पिकासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतुद करुन सरकारने शेतक-यांवर अन्याय केला अशी टीकाही त्यांनी केली.