मुंबई : अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीमध्ये एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी दिली होती. त्यातील १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारपर्यंत प्रवेश बदल केल्याची माहिती आहे. तर सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना शुक्रवारी प्रवेश बदल करण्याची शेवटची संधी आहे.महत्त्वाची बाब म्हणजे, गुरुवारी दहीहंडीची सुट्टी जाहीर झाल्यामुळे प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शनिवारी तिसऱ्या विशेष फेरीला सुरुवात होण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे उरलेल्या विद्यार्थ्यांना शनिवारपासून नवीन लॉग-इन आयडी आणि पासवर्ड देऊन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा किंवा विषय बदली करायचा आहे, असे विद्यार्थी या फेरीसाठी अर्ज करू शकतील.दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर एक विशेष फेरी घेण्यात येईल. फेर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या विशेष फेरीतून प्रवेश दिला जाईल. त्यासाठी तिसरी विशेष फेरी थांबवण्यात येणार नाही, तरी विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाप्रमाणे अर्ज करावेत. त्या आधी उपसंचालक कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)
अकरावीच्या १० हजारांहून जास्त विद्यार्थ्यांचा प्रवेश बदल
By admin | Updated: August 25, 2016 06:02 IST