‘वर्ल्ड कप’मुळं अवघा देश क्रिकेटमय बनलेला. ज्याच्या-त्याच्या तोंडी ‘बोल्ड’ नाही तर ‘सिक्स’चीच भाषा रंगलेली. अशावेळी सातारा जिल्ह्यातली काही नेतेमंडळी एकत्र जमली. रहिमतपूरच्या सुनीलरावांनी ‘बिघडलेलं घड्याळ’ खिशात टाकत कऱ्हाडच्या आनंदरावांसमोर एक कल्पना मांडली, ‘नाना.. आजकाल आपण निवांतच आहोत. एकमेकांशी भांडायलाही आता कोणते मुद्दे राहिले नाहीत. अर्थात भांडण्यासाठी त्राणही राहिलेलं नाही... तेव्हा आपण साताऱ्यात सर्व पक्षांच्या नेत्यांची मस्तपैकी क्रिकेट मॅच भरवायची का?’ ... झालं. काँग्रेस भवनात ‘वाल्मिकी’कडून बोलणी खावी लागल्यानं त्रासलेले ‘नाना’ही एकदम खूश झाले. त्यांनी ‘सर्वपक्षीय क्रिकेट मॅच’ला तयारी दर्शविली. ‘पण या मॅचबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांशी हक्कानं बोलणार कोण?’ असा खोचक सवाल चोरगेंच्या राजेंद्रनी हळूच विचारला. कारण प्रत्येक गोष्टीतले प्रॉब्लेम हुडकून लोकांसमोर मांडण्यात तसे ते भलतेच पटाईत. मात्र, यावरही तत्काळ मार्ग निघाला. ‘मोठ्या राजें’च्या नावावर साऱ्यांनीच शिक्कामोर्तब केलं. सर्व पक्षातल्या सर्वच नेत्यांशी छान-छान जवळीक राखण्यात ‘मोठ्या राजें’चा हात कुणीही धरू शकत नाही, यावर सर्वांचंच एकमत झालं. (मात्र, स्वत:च्याच पक्षातल्या काही नेत्यांशी त्यांचं बिलकूल जमत नाही, ही बाब अलाहिदा.) मग काय... ‘जलमंदिर’मधून दामल्यांनी सकाळी पेपरातल्या बातम्या फोनवरून वाचून दाखविताना या मॅचचीही माहिती राजेंना सांगितली. ‘कधी नव्हे ते आपल्या हातात सारी सूत्रे येताहेत,’ म्हटल्यावर ‘राजे’ही खूश झाले. त्यांनी तत्काळ पुण्याहून साताऱ्याकडं प्रस्थान केलं. भरधाव वेगातल्या गाडीत बसूनच त्यांनी ‘शिवतारेबापू’ अन् ‘चंद्रकांतदादां’ना कॉल लावला. दोघांशीही बोलून मॅचची तारीख ठरवली. भाजपच्या टीममध्ये कोण-कोण असावं, हे राजेंनी बोलता-बोलता हळूच दादांना सांगितलं. सेनेची टीम तर राजेंनीच फायनल केली.काँग्रेसची टीम तयार करताना मात्र ‘नानां’ची भलतीच दमछाक झाली. कऱ्हाडात त्यांना शंभर एक इच्छुक खेळाडू भेटले; पण तालुक्याबाहेर एकही चांगला कार्यकर्ता सापडला नाही. कारण, वाईत ‘मदनदादा’ नेहमीप्रमाणं पाहुण्यांचं स्वागत करण्यात मग्न होते, तर माण-खटावात सख्ख्या बंधूंशी दोन हात करण्यात ‘जयाभाव’ दंग होते. अखेर कंटाळून ‘नानां’नी ‘बाळासाहेबां’ना विनंती केली, तेव्हा कऱ्हाड पालिकेतली हक्काची टीम आमदारांनी काँग्रेसच्या मदतीला धाडली. त्या बदल्यात ‘कारखान्यात राजकारण आणू नका,’ असा नाजूक शब्द ‘नानां’ना टाकला. तेव्हा, शेजारीच उभारलेले कदमांचे धैर्यशील सटकले. ‘विधानसभेच्या राजकारणात विनाकारण कारखान्याच्या उसाची भिती दखविणारे हेच ते आमदार होते,’ याची आठवण त्यांनी करून दिली. मात्र, ‘नानां’ची परवानगी म्हणजे अॅटोमॅटिक ‘बाबां’चाही होकार असतो, हे ओळखूून बाकीची काँग्रेसची टीम ‘बाळासाहेबां’सोबत कामाला लागली. मानेंच्या सुनीलरावांनीही राष्ट्रवादीची तगडी टीम तयार केली. ‘रामराजें’चे तीन, ‘शशिकांतरावां’चे तीन, ‘छोट्या राजें’चे दोन अन् ‘मकरंदआबां’चा एक असे कार्यकर्ते निवडून त्यांनी नेहमीप्रमाणं ‘बॅलन्स’ साधला. ‘मोठ्या राजें’कडंही त्यांनी विचारणा केली, तेंव्हा त्यांचे कार्यकर्ते आॅलरेडी वेगवेगळ्या टीममध्ये विखुरले गेल्याचं (म्हणजे पध्दतशीरपणे पेरल्याचं!) काटकरांच्या सुनिलरावांनी सांगितलं. इकडं भाजपच्या ‘भरतरावां’नीही कऱ्हाडात ‘अतुलबाबां’च्या कार्यालयात गुप्त बैठक घेतली. यावेळी ‘खंडाळ्याचे पुरुषोत्तम’ अन् ‘जावळीचे दीपक’ही उपस्थित होते. भरपेट जेवणानंतर या साऱ्यांनी एकत्र बसून पुन्हा एकदा ‘मोदी’निष्टतेची शपथही घेतली. (ही घटना मात्र शंभर टक्के खरीखुरी बरं का! ‘सुपरहिट’मधली फॅन्टसी नव्हे.. )सेनेच्या ‘बानुगडे सरां’नीही टीममधल्या कार्यकर्त्यांना एक तास शिस्तीचं ‘लेक्चर’ ऐकविलं. ‘पाटलांच्या नरेंद्र’ना विकेटकिपिंगची जबाबदारी दिली. मात्र, भाजप टीममधल्या ‘सुवर्णा वहिनीं’ची मुद्दामहून कॅच सोडली तर थेट पॅव्हेलियनमध्ये परत पाठवू, अशी तंबीही दिली. इकडं ‘आरपीआय’ची टीम कुणी बनवायची, यावर ‘अशोकबापू’ अन् ‘किशोरभाऊ’ यांच्यात नेहमीप्रमाणं वाद सुरू झाला. पत्रकबाजीही झाली. त्यांचे काही कार्यकर्ते मात्र कलेक्टर आॅफिससमोर उभारून ‘आज बुवाऽऽ कोणत्या विषयावर आंदोलन करायचं?’ याची चर्चा करण्यात रमले. अखेर चारही पक्षांच्या टीम ठरल्या. मात्र, ही मॅच नेमकी कोणत्या मैदानात घ्यायची यावरून पुन्हा गोंधळ उडाला. ‘पृथ्वीराजबाबां’नी सुचविलेल्या जागेला ‘शशिकांतरावां’नी नकार दिला. तेव्हा ‘मोठ्या राजें’नी त्याला कडाडून विरोध केला. ( हे पाहून अनेकांना कागदावरच रखडलेल्या मेडिकल कॉलेजची आठवण झाली.) ‘लक्ष्मणतात्यां’च्या सूचनेनुसार ‘रामराजें’नी ‘छोट्या राजें’ना कानात काहीतरी सल्ला दिला. लगेच पालिकेतल्या साऱ्या ठेकेदारांची तातडीची बैठक बोलावून ‘छोट्या राजें’नी तत्काळ मैदान तयार करण्याचे आदेश दिले. तशी छान-छान प्रेसनोटही ‘मोकाशींच्या अमर’नं झटपट मीडियापर्यंत पोहोचविली. बापटांनीही सारे ‘नियम अॅडजेस्ट’ करून मैदान बनविलं. मॅचचा दिवस उजाडला. सारेजण मोठ्या उत्साहात मैदानाकडं निघाले. एवढ्यात बातमी थडकली की, ‘चोरगेंच्या चंदूनं या मॅचच्या विरोधात थेट हायकोर्टात धाव घेतलीय. कारण त्यांना म्हणे हे मैदानच बेकायदेशीर असल्याचा साक्षात्कार झालाय. त्यामुळं ही मॅच आता कॅन्सल!’
सचिन जवळकोटे