सासवड : स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सासवड शहर हगणदरीमुक्त झाल्याची घोषणा सासवड नगरपालिकेने केली आहे. सासवड शहर व परिसरात उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तीला १ हजार रुपये दंड व पोलिसांकडे गुन्हा दाखल अशी कारवाई करण्यात येणार आहे. सासवड शहर व परिसरात अनेक ठिकाणी इमारतींची बांधकामे चालू आहेत. या बांधकामांवर काम ळकरणारे मजूर हे उघड्यावर शौचासाठी बसताना आढळल्यास या व्यक्तींबरोबरच संबंधित बांधकाम व्यावसायिक व इमारत मालकांवर नगरपालिकेच्या वतीने बांधकाम परवानगी रद्द करून व अन्य प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे नगरपालिकेने जाहीर केले आहे. नगरपालिकेच्या वतीने प्रभागनिहाय ७ गुडमॉर्निंग पथके कार्यान्वित केली आहेत. या पथकातील कर्मचाऱ्यांद्वारे पहाटे ५ पासून पाहणी करून लक्ष ठेवण्यात येत आहे. मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्यासह खातेप्रमुख व कर्मचारी या पथकात काम करीत आहेत. नगरपालिकेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी स्वच्छ सासवड संकल्पनेस सहकार्याची भूमिका घेतली आहे. नागरिकांनीही या संकल्पनेस सहकार्य करावे व कायदेशीर कारवाई करण्याची वेळ नगरपालिकेवर आणू नसे असे आवाहन मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी केले आहे.
उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई
By admin | Updated: April 30, 2016 00:59 IST