मुंबई : रायगड जिल्ह्यातील शांतिनिकेतन आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आश्रमशाळेच्या संचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी विधान परिषदेत दिले. शांतिनिकेतन या बेकायदा आश्रमशाळेत ८ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले. या प्रकरणी संचालक ख्रिस्तियन राजेंद्रन, जॉय राजेंद्रन आणि सलोमी राजेंद्रन यांच्यावर कठोर करण्याबाबत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री म्हणाले की, शांतिनिकेतन आश्रमशाळेतील लैंगिक शोषण प्रकरणात प्राप्त झालेल्या व्हिडीओ क्लिप्स् तपासण्यात येतील. या प्रकरणी जास्तीतजास्त पुरावे गोळा करून संचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. शिवाय रायगड जिल्ह्यातील बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विशेष बैठक बोलावण्यात येणार असल्याचे राम शिंदे यांनी या वेळी सांगितले.अतिक्रमण प्रकरणी ताज हॉटेलला मुदतवाढ नाहीपंचतारांकित हॉटेल, मॉल्स् आणि विविध कंपन्यांकडून फुटपाथवर होणाऱ्या अतिक्रमणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलला महापालिकेने फुटपाथवर अतिक्रमण केल्याबद्दल दंड ठोठावला असून, १५ दिवसांत सदर दंडाची रक्कम भरण्याचे निर्देश हॉटेल व्यवस्थापनाला देण्यात आल्याची माहिती नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. काँग्रेस सदस्य अनंत गाडगीळ यांनी विविध पंचतारांकित हॉटेल्स्, मॉल्स्, सिनेमागृहे आणि खाजगी कंपन्यांकडून इमारतीलगत असणारे फुटपाथ अनधिकृतपणे काबीज करण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. मुंबईतील हॉटेल ताज व ओबेरॉय यांनी अशाच प्रकारे लगतच्या फुटपाथवर अतिक्रमण केले असून, त्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्य मंत्री रणजीत पाटील म्हणाले की, फुटपाथ व रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत मुंबई महापालिकेने ताज हॉटेलला ६ कोटी ९१ लाख तर हॉटेल ओबेरॉयला १६ लाखांचा दंड ठोठावला आहे. हॉटेल ओबेरॉयने प्रशासनाकडे दंडाची रक्कम जमा केली असून, ताजने मात्र अद्याप दंड भरलेला नाही. ताजने १५ दिवसांची मुदत मागितली असून, सदर मुदतवाढ अंतिम आहे. त्यानंतर कारवाई करण्याबाबत पालिकेला निर्देश देण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.जलवाहतूक चालू ठेवूया वेळी चर्चेत सहभाग घेताना शेकापच्या जयंत पाटील यांनी जलवाहतुकीचा मुद्दा मांडला. परदेशी पर्यटक आणि नेते हॉटेल ताजमध्ये उतरल्याचे कारण देत महिना-महिना जलवाहतुकीवर बंदी घातली जाते. बंदीची ही प्रथा बंद करण्याची करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली. यावर, परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेसोबतच जलवाहतूक अबाधित ठेवण्यात येईल. सुरक्षेच्या कारणास्तव भूमिपुत्रांच्या रोजगारावर गदा येऊ देणार नसल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले. अपंग प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीमराज्यातील अंपगांना प्रमाणपत्र व प्रमाणपत्रांच्या नूतनीकरणासाठी येत्या १५ आॅगस्टनंतर आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली. राष्ट्रवादीचे सदस्य अमरसिंह पंडित यांनी बीड जिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ, प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी अपंगांना माराव्या लागणाऱ्या खेपा व जिल्हा रुग्णालयातील गैरकारभाराबाबत लक्षवेधी सूचना मांडली. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना आरोग्य मंत्री सावंत म्हणाले की, राज्यभरातील अपंगांना प्रमाणपत्र तसेच प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी १५ आॅगस्टनंतर जिल्हा रुग्णालयात विशेष मोहीम राबविण्यात येईल.तसेच बीड जिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र व वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या बिले काढण्यासाठी होत असलेल्या गैरव्यवहाराची प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी केली जाईल. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या समितीचा अहवाल सभागृहासमोर ठेवला जाईल, असे सावंत म्हणाले. बीड जिल्हा रुग्णालयाची प्रधान सचिवांची समिती चौकशी करेल, असे सावंत यांनी या वेळी सांगितले.
लैंगिक शोषणाबाबत आश्रमशाळेवर कारवाई
By admin | Updated: July 22, 2015 01:16 IST