ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 17 - तुम्ही दुचाकीवर कामानिमित्त बाहेर पडत आहात, सावधान! डोक्यावर हेल्मेट, खिशात वाहन परवाना, दुचाकीची आरसी आणि विमा अशी कागदपत्रे जवळ ठेवा. चौकात पोलीस तपासणीत सापडलात आणि डोक्यावर हेल्मेट व इतर कागदपत्रे नसली तर किमान साडेतीन हजार दंड भरण्याची तयारी ठेवा. नव्या नियमानुसार दंड आकारण्याची मोहीम पोलीस व आरटीओ विभागाने सुरू केली आहे. केंद्र शासनाने अपघात रोखण्यासाठी वाहनांचे नियम कडक केले आहेत. प्रत्येक कलमाखालील दंडात दहापटीने वाढ केली आहे. या नियमांची अंमलबजावणी ४ आॅगस्टपासून राज्यभरात सुरू झाली आहे. त्यात मोबाईलवर बोलणे व हेल्मेट सक्तीचा प्रामुख्याने समावेश आहे. १५ आॅगस्टनंतर सोलापुरात ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त नामदेव चव्हाण यांनी वाहन तपासणीचे कडकपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. सहायक पोलीस आयुक्त महिपती इंदलकर यांनी मंगळवारी ३0५ व बुधवारी जवळपास २६६ दुचाकींवर कारवाई केली. वाहतूक पोलिसांनी मोबाईलवर बोलणारे, ट्रिपलसीट आणि राँग साईडने वाहने चालविणाऱ्यांना लक्ष्य केले. या वाहनधारकांना आरटीओचा मेमो दिला आहे. त्यामुळे वाहनधारकांना किमान साडेतीन हजारांचा दंड भरावा लागत आहे. दुचाकी वाहनांच्या तपासणी मोहिमेमुळे सुटी दिवशीही म्हणजे बुधवारी आरटीओ कार्यालय उघडे ठेवण्यात आले होते. दुपारी अडीच वाजेपर्यंत मेमो दिलेल्या वाहनांना दंड आकारून भरणा करून घेण्यात आला. दुपारपर्यंत २७ वाहनधारकांनी ६६ हजारांचा दंड भरून वाहतूक पोलिसांकडून वाहने सोडवून नेली. वाहतूक पोलिसांनी माणिक चौक, मधला मारूती, सिव्हिल चौक, दत्त चौक, संगमेश्वर कॉलेज, पार्क चौक, लकी चौक, शिवाजी चौक, सात रस्ता पेट्रोलपंप या ठिकाणी अचानकपणे थांबून दुचाकी वाहनांची तपासणी मोहीम घेतली. यात पोलिसांची मुलेही सापडली. नियम मोडणाऱ्यांवर कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कारवाई करण्यात आली. कारवाईत पो. नि. आगलावे, सपोनि चौगुले, सपोनि दोरकर, भुसनूर, माने, फौजदार भांबड, भंडारे, माळाळे यांच्यासह ७0 कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
आरटीओचा दंड मोठावाहतूक पोलिसांनी मोबाईलवर बोलणे, ट्रिपलसीट, राँग साईड वाहन चालविणाऱ्यांविरूद्ध मोहीम उघडली असली तरी वाहनधारकांना दंडाचा मेमो आरटीओच्या नावे दिला आहे. आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकांसमोर कागदपत्रांच्या तपासणीत वाहनधारकांना मोठा दंड भरावा लागणार आहे. आरटीओ निरीक्षकांसमोर वाहन परवाना, गाडीचा विमा, पीयुसी, आरसी बुक, हेल्मेट सक्तीचा दंड आकारला जात आहे. त्यामुळे प्रत्येकाला किमान एक हजारापासून ते साडेतीन हजारांपर्यंत दंड भरावा लागत आहे.
नव्या नियमाचा असा दंडविमा नसणे: २३00 (चालक व मालक), पूर्वी: ६00 रु.हेल्मेट नसणे: ५00 (पूर्वी: २00 रू़)परवाना नसणे: ६00 (१000 रु.)आकर्षक नंबरप्लेट: १000 (पूर्वी: १00 रु.)पीयुसी नसणे: १000 (१000 रु.)अतिवेग: १000 (१00 रु.)आरटीओ उघडणार मोहीमआरटीओ विभागातर्फे दुचाकी वाहन तपासणी मोहीम उघडण्यात येणार आहे. पुणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी बुधवारी सोलापूरला भेट दिली. त्यावेळी त्यांनी वाहतुकीच्या नियमांची कडकपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. दररोज प्रत्येक मोटार वाहन निरीक्षकावर वाहन तपासणीची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी मोहीम उघडली व आरटीओच्या नावे मेमो दिला. यामध्ये दंडाचे अधिकार आरटीओंना जादा असल्याने वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे. दोन दिवसांच्या कारवाईत नागरिकांनी मोठी ओरड केली आहे. इतका मोठा दंड झाल्याने हेल्मेट, कागदपत्रे किती प्रकाराची ठेवायची अशी कुरकुर ऐकावयास मिळाली.