ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मुंबईत चालत्या लोकलमध्ये एका तरूणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणा-या आरोपीला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. स्थानकावरील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली असून चर्चगेट स्थानकाजवळून या नराधमाला अटक करण्यात आली.
गेल्या आठवड्यात गुरूवारी रात्री पश्चिम रेल्वेच्या ग्रँट रोड व चर्नी रोड स्थानंकादरम्यान गुरूवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरूणी मालाड स्टेशनला चर्चगेटच्या दिशेने जाणा-या लोकलमध्ये चढली. गाडीत त्यावेळीस फारशी वर्दळ नव्हती याचाच फायदा घेत आरोपीने त्याचा डाव साधत तरूणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार डब्याच्या दुस-या टोकाला बसलेल्या काही महिलांच्या लक्षात आल्याने आरोपीने पुढील स्टेशन येण्याआधीच धावत्या ट्रेनमधून खाली उडी टाकली. ट्रेनमधील इतर प्रवासी महिलांनी पीडित मुलीला स्टेशन मास्तरकडे नेलं व त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिची चौकशी केली. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिस त्या आरोपीचा शोध घेत होते, अखेर आज त्याला अटक करण्यात आली.
दरम्यान हा तरूण नषेबाज असून तो चर्चगेट स्थानकाजवळच रहात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.