मुंबई : महाड येथील राजकीय नेते पांडुरंग घाणेकर यांच्या हत्येप्रकरणी एकाच घरातील पाच जणांची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. मे २०१६मध्ये स्थानिक सत्र न्यायालयाने पाचही जणांना घाणेकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले आहे.सत्र न्यायालयाने सर्व साक्षी-पुरावे नीट ग्राह्य धरले नाहीत, असे म्हणत दोषी विजय घुरूप यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केला आहे. याच अपिलात त्यांनी जामीन अर्जही केला आहे. यावरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.जामीन अर्जावरील सुनावणीत सरकारी वकिलांनी या घटनेची साक्षीदार घाणेकर यांची मुलगी असून, तिची साक्ष सत्र न्यायालयाने ग्राह्य धरली असल्याचे खंडपीठाला सांगितले. सुनावणीत घुरूप यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, १६ मार्च २००८ रोजी निवडणूक घेण्यात आली. १८ मार्च रोजी निकाल घोषित करण्यात आला. त्यात धामणे गटाचे चार सदस्य व पठणे गटाचे तीन सदस्य निवडून आले. धामणे गटात घाणेकरांचा तर पठणे गटात घुरूप यांचा समावेश होता. निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटांत हाणामारी झाली. सुरुवातीला दगडफेक झाली आणि मग मारामारी झाली. एकमेकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले.मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. घुरूप यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी घाणेकर यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला आणि घाणेकर यांच्यावर कुऱ्हाडीने घाव केला. रक्तबंबाळ झालेल्या घाणेकरांचा मृत्यू झाला आणि ही घटना घाणेकर यांच्या मुलीच्या डोळ्यांदेखत घडली, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.गेल्या वर्षी मे महिन्यात सत्र न्यायालयाने या सर्वांना दोषी ठरवले. खटल्यावेळी हे सर्व जण जामिनावर होते. त्यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर कारागृहात टाकण्यात आले. सत्र न्यायालयाच्या निर्णयाला पाचही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान केले आहे व जामीन अर्जही केला आहे. सर्व साक्षी-पुराव्यांचा फेरविचार अपिलावरील सुनावणीत करण्यात येईल. जामीन द्यावा, अशी ही केस नाही, असे म्हणत घुरूप कुटुंबीयांचा जामीन अर्ज फेटाळला. (प्रतिनिधी)
पांडुरंग घाणेकर हत्येप्रकरणी दोषींना जामीन नाही
By admin | Updated: March 17, 2017 03:37 IST