पवन सुखरुप : पोलीस पथक मुलाला व आरोपीला घेऊन येणारहिंगणघाट (वर्धा) : पवन गणपत ढगे या सात वर्षीय बालकाचे अपहरण करणाऱ्या संकेत देशमुख नामक युवकाला मंगळवारी सायंकाळी वर्धेच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर येथे अटक करण्यात यश मिळविले. आरोपीचे संकेत देशमुख हे नाव खोटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या तावडीतून पवनचीही सुटका करण्यात आली आहे. पोलिसांचे पथक दोघांनाही घेऊन हिंगणघाटकडे रवाना झाल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली. दोन दिवसांपासून गाजत असलेल्या या प्रकरणाचा शेवट सुखद झाल्याने पोलिसांसह पवनच्या आई-वडिलांनीही सुटकेचा श्वास घेतला.संकेत देशमुख हे खोटे नाव धारण करुन अपहरणकर्ता वावरत होता. त्याचे खरे नाव राहुल अरुण शेंडे (२५) रा. वरोरा जि. चंद्रपूर असे असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा छडा लावणे वर्धा जिल्हा पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात मात्र आरोपी अलगद अडकला.पवनचे अपहरण करतानाच राहुल शेंडे या अपहरणकर्त्याने पवनची मोठी बहिण सोनू हिचे एटीएम कार्ड पळवून नेले होते. त्याने मोठ्या शिताफीने पासवर्ड देखील माहिती करुन घेतला होता. अपहरण केल्यानंतर त्याने एका एसएमएसच्या माध्यमातून पवनच्या अपहरणाची माहिती दिली. इतकेच नव्हे, तर त्याने बँक खात्यात पाच लाख जमा करण्याची तंबीही दिली होती. घटना कानी पडताच जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी प्रकरणाची सूत्रे हातात घेत अपहरणर्त्याला अटक करण्याच्या अनुषंगाने सापळा रचला. अपहरणकर्त्यांच्या मागणीनुसार सोमवारी दुपारी सोनूच्या बँक खात्यात पाच लाख रुपये जमा केले. अपहरणकर्त्याने एटीएमचा वापर करुन रक्कम काढल्यास तो कुठे आहे. याचा पत्ता लागेल आणि त्याला अटक करण्यात यश येईल, असा बेत होता. यानुसार अपहरणकर्त्याने एटीएम कार्डचा वापर करीत सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास २५ हजार रुपये काढले. ही बाब लक्षात येताच त्याचे ‘लोकेशन’ घेतले असता तोे अकोल्यात असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. अखेर त्याने सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आपला भ्रमणध्वनी सुरू करताच त्याला ‘एसएमएस’ मिळाला. त्याने लागलीच पवनच्या घरी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला आणि पवनची मोठी बहीण सोनू हिच्याशी बोलला. इतकेच नव्हे, तर त्याने पवनचे आई-वडील यांच्याशीही संवाद साधला आणि पवनशीही त्यांचे बोलणे करुन दिले. या कालावधीत पोलिसांनी तो कुठे आहे. याचे अचुक ‘लोकेशन’ घेतले. अशातच त्याच्या शोधात असलेले वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय नाईक यांच्या नेतृत्वातील अजय रिठे, संजय गायकवाड, किशोर आप्तुलकर व मनोज नांदुरकर या पथकाला अपहरणकर्ता अरुण हा अहमदनगर येथे असल्याची माहिती दिली. लगेच या पथकाने ते स्थळ गाठून अपहरणकर्त्या राहुलला पवनसह ताब्यात घेण्यात यश मिळविले. या घटनेची वार्ता पवनच्या घरी पोहचताच अश्रूंचे आनंदात रुपांतर झाले. आता त्यांना पवनला डोळे भरुन बघण्याची वाट आहे.(तालुका प्रतिनिधी)एसएमएसने लागला शोधपोलीस अधीक्षक अनिल पारसकर स्वत: हे प्रकरण हाताळत होते. पवनची सुखरुप सुटका आणि अपहरणकर्त्याला अटक करण्यासाठी पोलिसांच्या सूचनेनुसार पवनच्या बहिणीच्या खात्यात पाच लाख रुपये जमा केले. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता अपहरणकर्त्याने पळवून नेलेल्या एटीएम कार्डच्या माध्यमातून अकोला येथील एका एटीएममधून त्यातील २५ हजार रुपये काढले. मात्र यात तो हाती लागला नाही. पुन्हा पोलिसांच्या सूचनेवरुन अपहरणर्त्याच्या भ्रमणध्वनीवर पवनच्या बहिणीच्या भ्रमणध्वनीवरुन पवनचे आई-वडील रडत असल्याचा एसएमएस पाठविला. त्याने भ्रमणध्वनी सुरू करताच तो कुठे आहे. याचे नेमके ‘लोकेशन’ पोलिसांना मिळाल्याने अपहरणकर्त्याचे बिंग फुटले.
अपहरणकर्त्याला नगरमध्ये अटक
By admin | Updated: July 16, 2014 01:11 IST