कऱ्हाड : ‘आघाडी शासनाने जनतेला पावाचा एक तुकडा देऊन गरिबी हटवायचा नारा दिला. कारखानदारी संपुष्टात आणली. दादा, आबा, बाबा हे नाटक कंपनीतले भाडोत्री कलाकार आहेत,’ अशी टीका केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली.कऱ्हाड दक्षिणमधील भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, ‘रिपाइं’चे अशोक गायकवाड, डॉ. सुरेश भोसले, नगरसेवक विनायक पावस्कर, महादेव पवार, विक्रम पावस्कर, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा शारदा खिलारे, नगरसेवक जयवंत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश जगताप, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, राजाभाऊ देशपांडे आदी उपस्थित होते. मंत्री गडकरी म्हणाले, ‘विधानसभेची ही निवडणूक इतिहासातील सर्वात महत्त्वाची आहे. कारण सध्या महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. सिंचनावर सत्तर हजार कोटी खर्च केलेत; पण ज्यावेळी श्वेतपत्रिका निघाली, त्यावेळी समोर आलेला सिंचनाचा आकडा धक्कादायक होता. महाराष्ट्र हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येंमुळे कुप्रसिद्ध झालेले राज्य आहे. युती सरकार असताना या राज्यात भारनियमन नव्हते; पण सध्या गावागावांत लोडशेडिंग सुरू आहे.’ ‘माझी आई आमदार किंवा वडील खासदार नव्हते. पोस्टर चिटकविणारा मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. मात्र, तरीही सामान्यांचा नेता झालो. नरेंद्र मोदी चहा विकायचे. ते पंतप्रधान झाले. कुणाच्याही कृपेने आम्ही निवडून आलेलो नाही. तिकडे मात्र आमदारांच्या पोटी आमदार जन्म घेतो आणि खासदारांच्या पोटी खासदारच जन्माला येतो. आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, तर ते मिर्झाराजे जयसिंगांचे. निवडणुकीनंतर या आबा, दादा आणि बाबांच्या गाड्या भंगारात विकाव्या लागतील; पण तेथेही त्याला किंमत मिळणार नाही. काँग्रेसची अवस्था सध्या सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे,’ असेही गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)कऱ्हाड पालिकेच्या २५ कोटींचं काय झालं ?‘कऱ्हाडला अठराशे कोटी दिल्याचे माजी मुख्यमंत्री सांगतायत; पण साडेचारशे कोटींत मंगळावर यान जात असेल, तर अठराशे कोटींची त्यांनी असली कसली कामे केली? मुख्यमंत्री असताना त्यांनी कऱ्हाड नगरपालिकेला २५ कोटी देतो म्हणून सांगितले होते; पण प्रत्यक्षात एक रुपयाही दिलेला नाही. नितीन गडकरी सहावेळा निवडून आले आणि हे तीनवेळा. मग मोठे कोण, आणि कोणी जास्त निवडणुका लढवल्या याचा विचारही त्यांनीच करावा,’ असेही डॉ. अतुल भोसले म्हणाले.
आबा, दादा, बाबा भाडोत्री कलाकार : गडकरी
By admin | Updated: October 6, 2014 22:33 IST