बीड - वडवणी तालुक्यातील खवळट लिमगाव येथे सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आकाशामध्ये तीन मोठे आवाज होऊन दगड कोसळले आहेत. यातील एक दगड भिकाजी अंबुरे यांच्या घरावर पडला. हा दगड इतक्या वेगाने पडला की घरावरील पत्रा तुटून दगड खाली पडला, तसेच अन्य दोन दगड इतर एक किलोमीटर परिसरात शेतामध्ये पडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
घरावर पडलेला दगड हा वेगळा असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले, तसेच दगड ज्यावेळी घरामध्ये पडला त्यावेळी हा दगड खूप गार लागल्याचेही सांगण्यात आले. खवळट लिमगावच्या आजूबाजूच्या गावच्या नागरिकांनी देखील भला मोठा आवाज झाल्याचे सांगितले. हा आवाज नेमका कशाचा झाला आणि दगड नेमके कुठून व कशामुळे पडले, भौगोलिक काही क्रिया आहे की पुन्हा संध्याकाळी घरावर दगड पडतील या भीतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहे.
दरम्यान घटनास्थळी वडवणीचे तहसीलदार वैभव महिंद्रेकर यांनी भेट दिली. हा दगड नेमका कुठून आणि कसा पडला, याची माहिती गावकऱ्यांकडून घेतली आहे, तसेच पंचनामा करून हा दगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
अलीकडेच बिहारमध्येही घडली होती घटना मागील महिन्यात बिहारच्या कटिहार जिल्ह्यात आकाशातून एक दगड पडल्याची रहस्यमय घटना घडली होती. आकाशातून पडलेल्या दगडाच्या तुकड्यांना स्थानिक लोक उल्कापिंड असल्याचं सांगत होते. रात्री १० च्या सुमारास एका घराच्या अंगणात दगडाचे तुकडे पडले. ज्यात एक सोनेरी रंगाचा दगड आकाशातून पडला जो हातात ठेवल्यानंतर त्याला आग लागली. ही घटना वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि लोकांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली. यात एका छोट्या मुलाने दगडाचा एक तुकडा उचलून त्याच्या मित्रांना दाखवण्यासाठी घेऊन जात होता. हा तुकडा त्याने पॅन्टच्या खिशात ठेवताच काही क्षणातच त्याच्या पॅन्टमध्ये आग लागली होती.