ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ३१ - गिरगावातील भटवाडी येथील पाठारे इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना ताजी असताना आज (रविवारी) सकाळी भिवंडीतील गैबीनगरमध्ये दुमजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृत्यूचा आकडा वाढून ९ वर पोहचला आहे.
ANI च्यावृत्तानुसार यादुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर काही वृत्तवाहीनींच्या आकडेवारीनुसार यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान लोकमतच्या वृत्तानुसार या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांची ओळख पटली आहे. तर ५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहेत तर २० जण स्थानिक रुग्णालयात उपचार घेत आहेत. या इमारतीत आठ ते नऊ कुटुंब रहात होती. घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.
ही इमारत आधीच धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरीही अन्य पर्याय नसल्याने रहिवाशी जीवाचा धोका पत्करुन या इमारतीत रहात होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाडया दाखल झाल्या आहेत. परिसर चिंचोळा असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नऊ जखमीपैंकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांना ठाण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू -इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन तरुण आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या घटनेतील मृतांचा आकडा ९ वर पोहचला आहे. ४२ वर्षीय शाहजहान खुर्शीद आलम अन्सारी, १७ वर्षीय सैफ खुर्शीद आलम अन्सारी, १५ वर्षीय खालिद खुर्शीद आलम अन्सारी आणि ११ वर्षीय शाकीन खुर्शीद आलम अन्सारी यांचा मृत्यू झाला आहे.