अकोला: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालक पदांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सरासरी ७६.३७ टक्के मतदान झाले आहे आहे. पोस्टाद्वारे प्राप्त झालेल्या मतपत्रिकांची शनिवार, १६ ऑगस्टपासून छाननी सुरू करण्यात आली असून, २२ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.महाबीज संचालक मंडळावर तीन वर्षांकरिता कृषी भागधारकांमधून दोन संचालकांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला-विदर्भ मतदारसंघातून अकोल्याचे खा. संजय धोत्रे, प्रशांत गावंडे व अमरावती जिल्हय़ातील प्रताप भुयार तसेच उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून परभणीचे नंदकुमार भोसले, नांदेडचे राजेश्वर पावडे व बुलडाणा जिल्हय़ातील वल्लभराव देशमुख निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीच्या मतदानासाठी अकोला-विदर्भ मतदारसंघात ३ हजार ३७६ आणि उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघात ३ हजार ३६ अशा एकूण ६ हजार ४१२ मतपत्रिका महाबीजमार्फत पोस्टाद्वारे भागधारकांकडे पाठविण्यात आल्या होत्या. पोस्टाद्वारे भागधारकांकडे पाठविण्यात आलेल्या मतपत्रिका १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३0 वाजेपर्यंत मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पाठविण्यात आलेल्या एकूण ६ हजार ४१२ मतपत्रिकांपैकी ४ हजार ८९७ मतपत्रिका पोस्टाद्वारे महाबीजकडे प्राप्त झाल्या. त्यामध्ये अकोला-विदर्भ मतदारसंघातून २ हजार ६३३ आणि उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून २ हजार २६४ मतपत्रिका प्राप्त झाल्या. त्यामुळे या निवडणुकीत सरासरी ७६.३७ टक्के मतदान झाले आहे. मतदानात प्राप्त झालेल्या मतपत्रिकांची छाननी शुक्रवार, १६ ऑगस्टपासून महाबीज भवन येथे सुरू करण्यात आली असून, २१ ऑगस्टपर्यंत मतपत्रिकांची छाननी प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार असून, निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
महाबीज संचालक पदांच्या निवडणुकीत ७६.३७ टक्के मतदान
By admin | Updated: August 17, 2014 00:15 IST