लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्राचा दोन वेळा नव्हे, तर तीन वेळा मुख्यमंत्री झालो. सर्वांत कमी तासांचा मुख्यमंत्री आणि अजित पवार हे कमी तासांचे उपमुख्यमंत्री, असा आमचा रेकॉर्ड झाला. मात्र, त्या ७२ तासांच्या मुख्यमंत्रिपदानंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने वरळी येथे आयोजित केलेल्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सन्मान स्वीकारला. खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे आमदार, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरवर्षी १ मे हा सण साजरा करणार : अजित पवारदरवर्षी १ मे हा महाराष्ट्राचा सण साजरा करणार आहोत. यात कोणतेही पक्षीय राजकारण नाही. आपले सरकार जनतेचे असून जनतेची कामे करत राहू. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते, परंतु सुसंस्कृत राजकारण कसे असते, हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी शिकवले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
शरद पवार, उद्धव ठाकरे यांची पाठमाजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याला शरद पवार व उद्धव ठाकरे आले नाहीत. या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे तसेच उद्धव ठाकरे यांनादेखील निमंत्रित केले होते. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना निमंत्रण दिले होते. त्यामुळे शरद पवार यांच्यासह ‘मविआ’चे माजी मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी चर्चा होती. परंतु, मुंबईत असूनही शरद पवार यांनी या कार्यक्रमाला नकार कळवला. तसेच पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आम्ही कार्यक्रमाला येणार नाही, असे अगोदरच कळविले होते.
‘विविध छटा एकाच ठिकाणी पाहता येणारा सुंदर महोत्सव’महाराष्ट्राच्या विविध छटा एकाच ठिकाणी पाहता येणारा हा सुंदर महोत्सव आहे. महाराष्ट्र काय आहे, हे येथील दालनातून पाहायला मिळत असून ते प्रत्येक तरुणाने पाहायला हवे. शक्ती-भक्तीचा इतिहास, थोर पुरुष, महाराष्ट्र रत्नांचा धावता इतिहास पाहता येईल, अशी प्रभावी मांडणी आहे. ६५ वर्षांत झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान हे चांगले आयोजन आहे. सिंहावलोकन केल्यास काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलला आहे. राजकीय मंच नसल्याने या महोत्सवाला सर्वच माजी मुख्यमंत्री आले असते तर बरे झाले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले.