अमरावती-नागपूर महामार्गावरील भीषण घटना : दोघांचीच ओळख पटलीअनिल रिठे - तळेगाव (श्या.) जि.वर्धाधावत्या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. आणि क्षणार्धात संपूर्ण बसला आगीने वेढले. यात ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर १५ प्रवासी गंभीररीत्या भाजले गेले. अंगावर शहारे आणणारी ही घटना गुरूवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अमरावती-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर येथून दोन कि.मी.वरील सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी घडली. एसी शॉट झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मृतांपैकी केवळ दोघांची ओळख पटली असून तिघांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींपैकी एकावर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून सात जणांवर कारंजा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. दोघांना उपचारानंतर सुटी देऊन पाच जणांना नागपूरला हलविण्यात आले. बाबा ट्रॅव्हल्सची एम.एच. ३१ सी.व्ही. २७७९ ही ट्रॅव्हल्स सुमारे ४0 प्रवासी घेऊन जळगाव येथून नागपूरला जात होती. पहाटे ४.४५ च्या सुमारास तळेगाव येथून नागपूरकडे जाण्यास निघाली असता सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी असलेल्या जैन मंदिरासमोर या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीने संपूर्ण बसला विळखा घातला. आगीचे रौद्र रुप पाहून प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडू लागले. चालकाने बस थांबविली. काही प्रवासी खिडकी व दारातून बाहेर पडले. यातील पाच प्रवासी झोपेत असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदश्रींंंंचे म्हणणे आहे. बसमधून बाहेर पडलेले काही प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून जखमींना कारंजा, आर्वी व नागपूर येथे उपचारार्थ हलविले. बसमध्ये अडकलेल्या पाचही जणांचा अक्षरश: कोळसा झाला होता. पाच मृतकांपैकी दोघांची ओळख पटली आहे. यात सुनील सच्चिदानंद पाल रा. मटकापूर (बिहार) यांचा नऊ महिन्याचा मुलगा आदित्य व २८ वर्षीय पत्नी श्वेता यांचा समावेश आहे. उर्वरित तीन मृतकांची अद्याप ओळख पटलेली नाही. जखमी आशिष गणपत लिलोरिया (३८) रा. प्रतापनगर नागपूर, दिवांशू चक्रधर भगवन (१0) रा. जळगाव, आकाश शशिकांत जैन (२३) रा. जळगाव, प्रताप प्रभाकर जोशी (४१) रा. जळगाव, संदीप ज्ञानेश्वर वंजारी (३0) रा. जामनेर नागपूर यांना कारंजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे प्रथमोपचारानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. सुनील पाल यांच्यावर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुभाष कोटंगळे (३५), पूनम कोटंगळे व मयंक रामेश्वर शुक्ला (२७) रा. नागपूर यांनी कारंजा रुग्णालयात उपचार करुन सुटी घेतली. किरकोळ जखमींमध्ये अमितकुमार सोनी (३७) रा. रायपूर, राजेश अग्रवाल (५३) रा. रायपूर, अतुल रमेशराव घाटे (४२) रा. नागपूर, विष्णू किसनराव सूर्यवंशी (३१) रा. नागपूर, प्रवीण कानोरे (३१) रा. नागपूर आदींचा समावेश आहे. बसचालक राजेश व क्लिनर घटनास्थळारून पळून गेले. उपविभागीय पोलीस अधिकारी बोरडे, आष्टी व कारंजा येथील ठाणेदार घटनास्थळी हजर होते. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.डोळ्यादेखत कुटुंबाची राखरांगोळीसुनील सच्चिदानंद पाल हा पेप्सिको कंपनीत कार्यरत आहे. त्याचे नागपूरला स्थानांतर झाले. पत्नी श्वेता व मुलगा आदित्यला घेऊन तो या बसने नागपूरला जात होता. त्याचे घरातील साहित्य दुसर्या वाहनाने पाठोपाठ येत होते. खिडकीतून उडी घेऊन नंतर पत्नी व मुलाला बाहेर काढावे, या बेताने तो खिडकीतून उडी घेऊन बाहेर आला. मात्र त्याने उडी घेतल्याचे पाहून त्याच्या पाठोपाठ बसमधील प्रवाशांनीही जिवाच्या भीतीने उड्या घेणे सुरू केल्यामुळे सुनीलला पत्नी आणि मुलाला बाहेर काढता आले नाही. तो बचावला. मात्र त्याच्या डोळ्यादेखत त्याच्या कुटुंबाची राखरांगोळी झाली.
ट्रॅव्हल्समध्ये होरपळून ५ ठार, १५ जखमी
By admin | Updated: May 30, 2014 01:16 IST