मुुंबई : गणेशोत्सवात शहरातील तब्बल ४६ ठिकाणे संवेदनशील ठरवून त्याभोवती सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. गणेशोत्सवाच्या उत्साहाला कोणत्याही अनुचित घटनेने गालबोट लागू नये यासाठी सोनसाखळी चोऱ्या, महिलांविरोधी गुन्हे, दहशतवादी कारवाया रोखण्यापासून गर्दीचे नियंत्रण, आपत्कालीन व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था आणि जातीय सलोखा राखण्यासाठी चोख उपाययोजना केल्याची ग्वाही सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) धनंजय कमलाकर यांनी केली.पोलिसांनी गणेशोत्सव काळात गर्दीच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणे कोणती याचा अभ्यास केला. त्यातून ४६ ठिकाणे निवडली. यात लाखो भाविक जमणारी प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, विसर्जन ठिकाणे, प्रमुख बाजारपेठा, रेल्वे स्थानकांचा सहभाग असल्याचे समजते. या ठिकाणांवर २४ तास सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. आतापर्यंत गणेशोत्सवकाळात दहशतवादी कारवायांचे इनपुट्स किंवा गुप्त माहिती मुंबई पोलिसांना मिळालेली नाही, असे कमलाकर यांनी स्पष्ट केले. मात्र गर्दीची ठिकाणे नेहमीच अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर असतात. म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबई पोलीस दलात ४५ हजार मनुष्यबळ आहे. हे संपूर्ण मनुष्यबळ बंदोबस्तासाठी रस्त्यावर असेल. बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांच्या मदतीला शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथकाचे जवान असतील, असे त्यांनी सांगितले.या काळात धार्मिक सलोखा कायम राहावा यासाठी एसीपी, डीसीपी, अपर आयुक्त या पातळ्यांवर मोहल्ला-शांतता कमिट्यांसोबत बैठका पार पडल्या आहेत. प्रत्येक बैठकीत तरुणांचा जास्तीत जास्त सहभाग असेल, यावर भर देण्यात आला. मध्यंतरी सोशल मीडियावरून महापुरुषांचा अवमान होईल, अशी छायाचित्रे-मजकूर प्रसारित झाला होता. त्यावरून राज्यात काही ठिकाणी तणाव निर्माण झाला. मात्र मुंबईतले जनजीवन सामान्य राहिले. हाच धागा पकडून सोशल मीडियावरून प्रसारित झालेले छायाचित्र किंवा मजकूर पाहून हिंसक प्रतिक्रिया दिल्यास मजकूर पसरविणाऱ्याचा उद्देश सफल होईल, अशी जनजागृती केल्याचे कमलाकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुंबईतील ४६ ठिकाणे संवेदनशील
By admin | Updated: August 27, 2014 04:19 IST