ऑनलाइन लोकमत
गंगाखेड, दि. १० - आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अजित पवार यांच्यासह अन्य दोन जणांविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेडमध्ये तपासणी दरम्यान अजित पवार यांच्या गाडीत ४ लाखांची रोकड सापडली होती. अजित पवार यांनी १ लाख रूपयांपेक्षा अधिक रोकड बाळगल्याने आणि पक्षाकडून कोणताही लेखी पुरावा सादर न केल्याने हा आचारसंहितेचा भंग होतो असे निवडणूक अधिका-याने म्हटले आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे व गाडीचा चालक कृष्णा हजारे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या गाडीत ४ लाखांची रोकड सापडल्यानंतर खळबळ उडाली होती परंतू ही रोकड पक्ष फंडातील आहे असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले होते.