मुंबई : भारतात बेकायदा आणलेले ३८ कोटी ३२ लाख रुपये किमतीचे चिनी फटाके कस्टम अधिकाऱ्यांनी न्हावा-शेवा येथे जप्त केले असून, त्यापैकी १ कोटी रुपये किमतीचे फटाके नष्टही केले आहेत. स्वस्त असलेल्या चिनी फटाक्यांना चांगली मागणी असते हे माहीत असल्याने भारतात बंदी असलेले फटाकेही बेकायदा समुद्रमार्गे आणले जातात. कागद आणि क्रोकरीच्या नावाखाली त्यांची आयात केली जाते. चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशिअम क्लोरेट आणि सल्फरचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला असतो. त्यामुळे प्रदूषण तर होतेच शिवाय ते धोकायदायकही ठरू शकतात. परिणामी भारताने पोटॅशिअम क्लोरेट आणि सल्फर असलेल्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. तरीही अधिक नफा मिळत असल्याने काही व्यापारी बेकायदा आयात करतात. भारतात फटाक्यांची बाजारपेठ सुमारे ४ हजार कोटींची आहे. तामिळनाडूतील शिवकाशी जिल्ह्यात फटाक्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तरीही व्यापारी सुमारे १५०० कोटींच्या फटाक्यांची तस्करी करतात, असे आढळले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
न्हावा-शेवा येथे पकडले ३८ कोटींचे चिनी फटाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 04:42 IST