मुंबई : देशात ‘अच्छे दिन’ आणण्याची ग्वाही देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त देशभरातील ११ हजारांहून अधिक वर्तमानपत्रांना तब्बल ३५ कोटी ५८ लाख ७० हजार ३८८ रुपयांच्या जाहिराती दिल्या आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर ही माहिती दिली आहे. मात्र वृत्तपत्र वगळता अन्य माध्यमांसाठी आलेल्या खर्चाची माहिती देण्यास नकार दिला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला २६ मे २०१६ रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त विविध माध्यमांद्वारे जाहिराती देण्यात आल्या होत्या. त्याबाबतची सविस्तर माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागितली होती. त्याबाबत जाहिरात आणि दृकक्षाव्य संचालनालयाच्या जनमाहिती अधिकारी रुपा वेदी यांनी एका सीडीद्वारे माहिती दिली आहे. त्यामध्ये देशभरातील ११,२३६ लहान-मोठ्या वर्तमानपत्रांना दिलेल्या जाहिरातींचा तपशील आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान परदेश दौऱ्यांची माहिती संकेतस्थळावर जाहीर करतात, त्याप्रमाणे सर्व खर्चाची माहिती जाहीर का करत नाहीत? असा प्रश्नही अनिल गलगली यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे केला आहे. (प्रतिनिधी)> मनमोहन सरकारचा खर्च शून्यगलगली यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर जाहिरातींवर केलेल्या खर्चाचीही माहिती गलगली यांनी मागितली होती. त्यावर यूपीए सरकारने एकही जाहिरात केली नव्हती. त्यामुळे त्यासाठी एक रुपयाचाही खर्च आला नव्हता, असे कळविण्यात आले आहे.
मोदी सरकारच्या वर्धापनदिनी ३५.५८ कोटीच्या जाहिराती
By admin | Updated: August 2, 2016 05:32 IST