पुणे : हुंड्याची मागणी करून लग्न मोडणाऱ्या कुटुंबाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांनी एका कुटुंबातील तिघांना ३ महिने साधी कैद तसेच प्रत्येकी ३ हजार रुपये दंड भरण्याचाही आदेश दिला.सौरभ शर्मा (२६), वडील सुरेंद्रकुमार कृष्णदेव शर्मा (६०), आई सुरेंद्रबाला शर्मा (६०, रा. नवी दिल्ली) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. सौरभ हा एमबीए असून अहमदाबाद येथे शिक्षण घेत असताना त्याची २२वर्षीय तरुणीशी ओळख झाली व नंतर प्रेमात रूपांतर झाले. त्या वेळी सौरभचे आईवडील पुण्याला वास्तव्यास होते.तरुणीचा भाऊ व आई हे शिक्षणानिमित्त पुण्यात आले होते. लग्नाची बोलणी करण्यासाठी सौरभच्या आईने कोरेगाव पार्क येथील बागेत भेटण्याचे ठरविले. त्यानुसार भेट झाली. नंतर ६ जुलै २००६ रोजी साखरपुडा झाला. १२ डिसेंबरला लग्न ठरले. त्यानुसार तरुणीच्या आईने हॉल बुकिंग व इतर तयारी सुरू केली. मात्र काही दिवसांतच सौरभची आई विविध सबबी देत टाळाटाळ करू लागली. एक मोटार आणि ५ लाख रुपये द्या, तरच लग्न होईल, अशी भूमिका सौरभच्या कुटुंबीयांनी घेतली. यापूर्वी कधीही याबाबत चर्चा झाली नाही आणि एवढे देणे शक्य नसल्याचे तरुणीच्या आईने त्यांना कळविले. यानंतरही एक वर्षभर तरुणीने सौरभचे मन वळेल याची वाट पाहिली आणि सरतेशेवटी तिने कोरेगाव पार्क येथे फसवणूक व हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
हुंड्यासाठी लग्न मोडणा-या कुटुंबाला ३ महिन्यांची कैद
By admin | Updated: September 26, 2014 02:55 IST